'महाभारतचा सत्यानाश केला'; मुकेश खन्नाने एकता कपूरवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 09:45 IST2024-03-20T09:44:50+5:302024-03-20T09:45:24+5:30
Mukesh khann : अलिकडेच मुकेश यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये एकतावर निशाणा साधला आहे.

'महाभारतचा सत्यानाश केला'; मुकेश खन्नाने एकता कपूरवर साधला निशाणा
छोट्या पडद्यावर ९०चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेता म्हणजे मुकेश खन्ना. शक्तीमान या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. मुकेश खन्ना सोशल मीडियावर सक्रीय असून सातत्याने ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. इतकंच नाही तर समाजात वा कलाविश्वात घडणाऱ्या घटनांवर बेधडकपणे भाष्यही करतात. यामध्ये अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी एकता कपूरवर ताशेरे ओढले आहेत.
मुकेश खन्ना यांनी 'डिजिटल कमेंट्री'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये 'एकता कपूरने महाभारतचा सत्यानाश केला आहे,' असं म्हणत त्यांनी एकतावर टीकेची झोड उठवली आहे.
नेमकं काय म्हणाले मुकेश खन्ना?
"मी बेधडकपणे बोलतो जे इतर लोक कधीच बोलत नाहीत. मी ड्रग्स विरोधात बोललो, कोणी पॉर्नोग्राफी केली मी त्याच्याविरोधात बोललो. इंडस्ट्रीत कोणीही वाईट नाही. धर्माच्या विरोधात काम केलं जातं. जसं की अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब. मी त्याच्याही विरोधात बोललो होतो. मी एकता कपूरच्या विरोधात बोललो तर तिने उद्या सिनेमा करायला घेतला तर त्यात ती मला घेणार नाही," असं मुकेश खन्ना म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "मी या सगळ्यापासून लांबच आहे. कोणापुढे हात पसरायला मला आवडत नाही. तू काय मला काम देशील. तू तर महाभारतचा सत्यानाश केला आहेस. आता हे बोलायची हिंमत अन्य कोणत्या कलाकारामध्ये नाही."
दरम्यान, एकता कपूरने आतापर्यंत अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. यामध्येच सध्या तिची महाभारत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील घटनाक्रम, कलाकारांचा अभिनय आणि एकंदरीत त्यांची बांधणीवरुन मुकेश खन्ना यांनी या मालिकेवर आणि एकतावर टीका केली आहे.