आधी नकार, मग प्रेमात...! अशी सुरू झाली होती ‘मुलगी झाली हो’ फेम ‘माऊ’ची लव्हस्टोरी...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 03:58 PM2022-02-14T15:58:45+5:302022-02-14T16:11:06+5:30
Mulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेतील साजिरीला आताश: कोण ओळखत नाही. अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर हिने साजिरीची ही भूमिका साकारली आहे. लवकरच दिव्या अक्षय घरत याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेतील साजिरीला आताश: कोण ओळखत नाही. अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर ( Divya Subhas Pugaonkar) हिने साजिरीची ही भूमिका साकारली आहे. लवकरच दिव्या तिचा खऱ्या आयुष्यातील प्रियकर अक्षय घरत याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांचा ‘टिळा’ सेरेमनी पार पडला होता. आज व्हॅलेन्टाईन डेला आम्ही दिव्या व अक्षय यांची प्रेमकहाणी सांगणार आहोत. ही प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमीनाही.
ही प्रेमकहाणी सुरू झाली, बहरली ती लॉकडाऊनच्या काळात. सोशल मीडियावर ही लव्हस्टोरी सुरू झाली आणि बघता बघता दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
अक्षय घरत हा फिटनेस ट्रेनर व मॉडेल आहे. शिवाय एका परदेशी बँकेसाठी तो काम करतो. लग्नाचं वय झाल्याने तो एका पार्टनरच्या शोधात होता. एक दिवस त्याने फेसबुकवर दिव्याची प्रोफाइल बघितली आणि लगेच तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पण दिव्याने 15 दिवस अक्षयची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नव्हती. आधी तिने अक्षयची अख्खी माहिती काढली आणि मग कुठे त्याची फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारली. हळूहळू दोघांचं चॅटिंग सुरू झालं. मग हळूच कॉल सुरू झालेत. मग व्हिडीओ कॉलपर्यंत प्रकरण गेलं आणि यानंतर दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं.
कडक लॉक डाऊन होतं. पण तरीही या काळात अक्षय दिव्याला पहिल्यांदा भेटायला आला. पण दिव्याला पाहताक्षणीच ही खूप लहान आहे, असा पहिला विचार अक्षयच्या डोक्यात आला. दिव्याच्या डोक्यातही यापेक्षा वेगळा विचार नव्हता. तिलाही अक्षय वयाने मोठा वाटला. भेट संपली आणि रात्री फोन करून दोघांनी एकमेकांना आपला नकार कळवला. अर्थात लव्हस्टोरी संपली नाही. ती तर खºया अर्थाने इथून पुढे सुरू झाली. या नकारानंतर अक्षय दिव्याला प्रचंड मिस करू लागला होता. यानंतर दोघांमधील संवाद पुन्हा सुरू झाला. पण पुन्हा एक अडचण आलीच.
दिव्या अभिनेत्री आहे हे अक्षयच्या घरी समजलं त्यावेळी कलाकारांना वेळेचं बंधन नसतं, रात्री अपरात्री शूटिंगला जावं लागतं या कारणास्तव त्याच्या घरच्यांनी तिला नकार दिला. पण अक्षय दिव्यात पूर्णपणे गुंतला होता. कालांतराने त्याच्या आई वडिलांनी दिव्याला पसंती दर्शवली. दिव्या आणि अक्षय यांच्यात आता खूप छान बॉंडिंग झालं आहे आणि दोघं लवकरच नवरा बायको होणार आहेत.
दिव्या पुगावकर हिने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेआधी ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘विठुमाऊली’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे