‘मुलगी झाली हो’ मालिकेची चिंता वाढली,या कलाकाराला कोरोनाची लागण झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:26 PM2021-05-01T17:26:13+5:302021-05-01T17:30:45+5:30
मालिकेच्या शूटिंगमुळे ते गुजरातला गेले होते. तिथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
'ब्रेक द चेन'अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लॉकडाउनमुळे मालिका, चित्रपट, जाहिरात आदींच्या चित्रीकरणासाठी बंदी आहे. अशात मालिकेचे शूटिंग थांबू नये म्हणून मालिकांचे सेट महाराष्ट्राबाहेर उभारण्यात आले. अनेक मालिकांचे स्थलांतरण झाले. दमन, गुजरात गोवा, सिल्वासा, बेळगाव अशा ठिकाणांना निर्मांत्यानी शूटिंगसाठी पसंती दिली. म्हणून बहुतांश हिंदीसह मराठी मालिकांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणास सुरुवात केली.
यात 'मुलगी झाली हो' मालिकेच्या शूटिंगला गुजरातमध्ये सुरुवात झाली होती. नुकतेच गुजरातमध्ये स्थलांतरण झालेली मुलगी झाली हो मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा किरण माने यांना कोरोनाची लागण झाली आहे.मालिकेच्या शूटिंगमुळे ते गुजरातला गेले होते. तिथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. खुद्द किरण माने यांनीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
“अनपेक्षितपणे मलाही गाठलं त्यानं. गुजरातमधून माझ्या माणसांत आलोय. सातार्यात देवासारखी माणसं जोडली, ती मनापासून काळजी घेतायत. तुमचं प्रेम राहूद्यात सोबत.. चुटकीसरशी ‘निगेटिव्ह’ होऊन दाखवतो ! एकाकीपणात तुमची साथ मोलाची असेल” अशी फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते त्यांना काळजी घेण्यास सागंत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
कोरोना दिवसेंदिवस फक्त महाराष्ट्रातच नाही तर सर्वत्रच तिव्रतेने पसरताना दिसत आहे. अशात मालिकांनी शूटिंग न थांबवता इतक ठिकाणी जात शूटिंग करायला सुरुवात केली असली तरीही कोरोनापासून तिथेही कलाकार सुरक्षित नसल्याने कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. रसिकांच्या मनोरंनासाठी कुठेच ब्रेक लागू नये म्हणून मालिकेचा सेट महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आला होता. अशात मालिकेच्या मुख्य कलाकारालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे काही दिवस तरी ते काम करु शकणार नाहीत. अशात त्यांच्या अनुपस्थित मालिकेच्या पुढच्या भागांचे शूटिंग कसे होणार हा मोठा प्रश्न आता निर्मांत्याना पडला आहे.