Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:35 AM2024-10-15T10:35:21+5:302024-10-15T10:37:55+5:30
Munawar Faruqui And Lawrence Bishnoi : फक्त सलमान खानच या गँगच्या हिटलिस्टवर नाही तर 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकी देखील आहे.
अभिनेता सलमान खानच्या मागे असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त सलमान खानच या गँगच्या हिटलिस्टवर नाही तर 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकी देखील आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यातच मुनव्वरला सुरक्षा पुरवली होती. मात्र आता त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुनव्वरचा दिल्लीत काही लोकांनी पाठलाग केला होता. ज्यांचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचं म्हटलं जात आहे. अशा स्थितीत कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवणार आहेत. मुनव्वर हे या गँगच्या टार्गेटवर का आहे, याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
सप्टेंबरमध्ये मुनव्वर एंटरटेनर्स क्रिकेट लीगसाठी दिल्लीत असताना काही शूटर्सनी त्याच्या हॉटेलची रेकी केली होती. मुनव्वरच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. यासोबतच या सामन्यादरम्यान एल्विश यादवलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या, त्यानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा इशारा
१२ ऑक्टोबरला बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि १३ ऑक्टोबरला फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी घेतली होती. सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानला सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. यासोबतच त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट आणि सलमानच्या पनवेल फार्महाऊसवरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.