आज भारताची लेक म्हणताना लाज वाटतेय...! ‘टप्पू’सोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे संतापली मुनमुन दत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 04:37 PM2021-09-12T16:37:25+5:302021-09-12T16:38:37+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : स्वत:पेक्षा 9 वर्षांनी लहान टप्पूला डेट करत असल्याच्या या चर्चांमुळे मुनमुन प्रचंड ट्रोल होतेय. आता मुनमुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)या मालिकेतील बबीताजी अर्थात मुनमुन दत्ता (Munmun Dutta ) सध्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा टप्पू अर्थात राज अनादकत याला मुनमुन डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे. स्वत:पेक्षा 9 वर्षांनी लहान टप्पूला डेट करत असल्याच्या या चर्चांमुळे मुनमुन प्रचंड ट्रोल होतेय. अनेकजण सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवत आहेत. आता मुनमुनने या ट्रोल करणा-यांवर संताप व्यक्त करत, एक खुलं पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. मला आज भारताची लेक म्हणायला लाज वाटतेय, अशा तीव्र शब्दांत तिनं आपला संताप व्यक्त केला आहे.
सामान्य जनतेसाठी लिहिलेल्या या खुल्या पत्रात ती लिहिते,
‘मला तुमच्याकडून यापेक्षा खूप चांगल्या अपेक्षा होत्या. पण कमेंट्समध्ये जी घाण तुम्ही ओतली, त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे, तथाकथित ‘सुशिक्षीत’ असूनही आपण एका मागासलेल्या समाजाचा भाग आहोत. केवळ स्वत:च्या मजेसाठी एखाद्या महिलेच्या वयावर, तिच्या संबंधांवर नको ते बोलून तिला लाजीरवाणं केलं जातं. मग या विनोदामुळे भलेही एखादी व्यक्ती मेंटल ब्रेकडाऊनच्या अवस्थेत गेली तरी तुम्हाला फरक पडत नाही. मी गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करतेय. पण माझ्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगायला तुम्हाला 13 मिनिटंही लागली नाहीत. तुमचे शब्द एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडतील, त्याआधी फक्त एकदा विचार करा. तुमचे शब्द एखाद्याला टोकाचं पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त तर करत नाहीत ना, याचा विचार करा. आज मला स्वत:ला भारताची लेक म्हणताना लाज वाटतेय.
मीडियालाही सुनावलं
कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर काल्पनिक बातमी देण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिलेत? तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यावर जो काही परिणाम होतो, त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात का? एखाद्या स्त्रीने नुकताच तिचा मुलगा किंवा प्रियकर गमावला असेल तरी तुम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढता, हे सगळं फक्त तुम्ही तुमच्या टीआरपीसाठी करता. पाहिजे ते वृत्त किंवा हवं ते हेडिंग देत तुम्ही कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का देऊ शकता. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे जमणार नसेल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे,’ असं मुनमुनने लिहिलं आहे.
मुनमुन दत्ता 2008 सालापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा भाग आहे. तर टप्पू अर्थात राजने 2017 मध्ये शोमध्ये एन्ट्री घेतली होती. राज व मुनमुन यांच्या अफेअरच्या बातम्या येताच लोकांनी मुनमुनला तिच्या वयावरून ट्रोल करणं सुरू केलं. मुनमुन 33 वर्षांची आहे तर राज 24 वर्षांचा आहे. अद्याप या अफेअरच्या बातम्यांवर मुनमुन वा राज यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.