रमाचं पहिलं प्रेम! 'मुरांबा' मालिकेला 2 वर्ष पूर्ण, शिवानी मुंढेकरने लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 06:41 PM2024-02-14T18:41:50+5:302024-02-14T18:43:18+5:30
दोन वेण्यांच्या लूकमध्ये साध्याभोळ्या रमाने म्हणजेच शिवानीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' (Muramba) ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. यामध्ये सर्वांचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकर (Shashank Ketkar) मुख्य भूमिकेत आहे. त्याने अक्षय मुकादम हे पात्र साकारलं आहे. तर या मालिकेतून दोन अभिनेत्री नावारुपाला आल्या आहेत. रमा आणि रेवाच्या भूमिकेत असलेल्या शिवानी आणि निशानी. शिवानी मुंढेकर हिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. तर निशानी बोरुले ही खलनायिका आहे. 'मुरांबा' मालिकेला आज २ वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने शिवानी मुंढेकरने खास पोस्ट लिहिली आहे.
दोन वेण्यांच्या लूकमध्ये साध्याभोळ्या रमाने म्हणजेच शिवानीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पहिल्याच मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. तिची आणि अक्षयची जोडी तर प्रेक्षकांना खूपच आवडली. शिवानीने मुरांबा मालिकेच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील क्षण शेअर केले आहेत. सहकलाकारांसोबत दोन वर्षातील खास फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिले, "मुरांबाची जादुई 2 वर्ष...जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आणि मला ती मिळाली. पहिलं सगळंच खास असतं... पहिलं प्रेम, पहिला पाऊस, पहिली भेट... असाच माझ्याही आयुष्यातला आजचा एक स्पेशल दिवस “माझं पहिल काम” मुरांबाला २ वर्ष पूर्ण झाली. मुरांबावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे कृतज्ञतेने आभार यापुढेही असेच प्रेम आमच्या मुरांबा मालिकेला व तुमच्या लाडक्या रमाला मिळत राहो हीच सदिच्छा!"
शिवानीला रमा या भूमिकेमुळे प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. शिवाय मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी, शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशानी बोरुले, सुलेखा तळवलकर, आशिष जोशी, काजल काटे, स्मिता शेवाळे, विपुल साळुंखे यांचीही भूमिका आहे. मालिकेची एकूणच गोष्ट, रमा-अक्षयची प्रेमकहाणी सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे.