Exclusive: 'मुरांबा'मधल्या 'रेवा'चा खुलासा; म्हणाली, "खलनायिका साकारायची इच्छा नव्हती पण..."
By ऋचा वझे | Updated: January 6, 2025 14:51 IST2025-01-06T14:50:23+5:302025-01-06T14:51:29+5:30
"पुण्याहून मुंबईत आले आणि सहा महिन्यातच कोरोना आला...", अभिनेत्री निशानी बोरुलेने 'लोकमत फिल्मी'शी सविस्तर संवाद साधला.

Exclusive: 'मुरांबा'मधल्या 'रेवा'चा खुलासा; म्हणाली, "खलनायिका साकारायची इच्छा नव्हती पण..."
>> ऋचा वझे
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिका सुरुवातीपासूनच गाजत आहे. दोन वर्षांपूर्वी सुरु झालेली ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. यातील रेवा ही निगेटिव्ह भूमिका साकारणारी अभिनेत्री निशानी बोरुले सगळ्यांचीच लाडकी बनली. निगेटिव्ह भूमिका असली तरी तिने तिच्या क्युटनेसने सर्वांचं मन जिंकलं. मात्र खलनायिका साकारण्यासाठी आधी ती तयार नव्हती असा खुलासा तिने केला आहे. एकंदर मालिका आणि तिच्या यापूर्वीच्या कामाबद्दल निशानी बोरुलेने 'लोकमत फिल्मी'शी सविस्तर संवाद साधला.
'मुरांबा'मालिकेत खलनायिका साकारण्यासाठी लगेच होकार दिला का?
खरंतर मी खलनायिका करायला तयार नव्हते.कारण त्याआधी मी सकारात्मक भूमिकांसाठीच ऑडिशन दिल्या. स्टार प्रवाहच्याच एका दुसऱ्या मालिकेमधील मुख्य भूमिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. माझे वर्कशॉपही झाले. मात्र ऐनवेळी अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे मी त्या मालिकेचा भाग होऊ शकले नाही. काही दिवसांनंतर मी 'मुरांबा' साठी ऑडिशन दिली.
मी रमा आणि रेवा अशा दोन्ही भूमिकांसाठी ऑडिशन दिली होती. कारण त्यांना माझ्याकडून दोन्ही हव्या होत्या. मला तेव्हा रेवाची भूमिका अगदी निगेटिव्ह असेल असं नव्हतं सांगितलं. ग्रे शेड असणार, दोन मैत्रिणींची गोष्ट असणार असं मला सांगण्यात आलं होतं. १०-१२ दिवसांनंतर माझी रेवाच्या भूमिकेसाठी निवड झाली. थोडी ग्रे शेड भूमिका आहे तर इंटरेस्टेड आहेस का असं मला त्यांनी विचारलं. तेव्हा कोरोना नुकताच संपला होता, फारसं काम चालू नव्हतं. प्रवाहसारख्या चॅनेलमध्ये संधी मिळतीये म्हणून मग मी होकार दिला.
मालिकेतील सध्याच्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या निगेटिव्ह कमेंट्सही येतात. कलाकार म्हणून त्यावर तुमची काय रिअॅक्शन असते?
शेवटी हे आमच्या हातात नसतं. चॅनेल आणि क्रिएटिव्हच हे ठरवतात. प्रेक्षकांना काय आवडेल ते देण्याचा त्यांच्या परीने ते प्रयत्न करत असतात. तसंच इतर मालिकांमध्ये काय चालू आहे, त्यांचा ट्रॅक आणि आपला ट्रॅक सारखाच व्हायला नको हेही बघावं लागतं. आमच्या मालिकेतही बऱ्याच ट्विस्टला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. जसे चांगले कमेंट्स असतात तसेच निगेटिव्हही असतातच. तो या इंडस्ट्रीचा भागच आहे.
'मुरांबा'आधी तू कोणकोणतं काम केलं आहेस?
मी तेलुगू आणि तमिळ जाहिराती केल्या आहेत. तसंच फ्लिपकार्ट ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीरिज केली.कलर्सवर 'महाराष्ट्र जागते रहो' मध्येही मी काम केलंय. स्टार प्रवाहवरच 'प्रेमा तुझा रंग कसा' मालिकेच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मी होते. 'चुलबुली चाची' ही हिंदी विनोदी मालिकाही मी केली. तसंच 'हिरकणी' सिनेमातही माझी छोटी भूमिका होती. त्यात शिवाजी महाराजांच्या सर्वात लहान पत्नीच्या भूमिकेतही मी होते. काही अल्बम साँग्स केले. 'अंजीच्या हळदीचा' हे आयटम साँगही मी केलं.
या क्षेत्रात नकारही पचवावे लागतात. त्याला तू कशी सामोरी जाते?
आधी मला डिप्रेशन यायचं. नक्की काय चुकतंय हा प्रश्न पडायचा. पण जे होतं चांगल्यासाठीच होतं हे मी लक्षात ठेवते. कदाचित यापेक्षा चांगली गोष्ट मला मिळणार असेल. त्यासाठी मी सहन केलंच पाहिजे. कधी कोणाचं वाईट होत नाह. प्रयत्न करत राहिलं तरच ते मला मिळणाय नकार पचवावे लागतील, स्वत:मध्ये बदल करावे लागतील ही तयारी ठेवणं गरजेचंच आहे.
अनेकदा कलाकारांना वेळेत मानधन मिळत नाही त्यावर काय वाटतं. तुलाही असा अनुभव आला आहे का?
कलाकार हा प्रेझेंटेबल असायला हवा अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. सगळं टापटीप पाहिजे. यासाठी आम्हाला स्वत:वर खूप खर्च करावा लागतो. त्यानंतर आम्ही एखादी मालिका केली की आम्हाला पहिले तीन महिने काहीच मोबदला मिळत नाही. तीन महिन्यांनंतर आम्हाला मानधन मिळायला सुरुवात होते. ते करत असताना मुंबईत राहण्याचा खर्च भागवावा लागतो. हे सांभाळताना आपल्याला प्रेझेंटेबल राहावं लागतं. काही प्रोडक्शन अगदी वेळेत पैसे देतात. पण हो याआधी मलाही असे अनुभव आलेत की काम करुनही मला पैसे मिळवण्यासाठी झगडावं लागलं आहे.
यापुढेही खलनायिकेच्या भूमिका करणार का?
सध्यातरी काही काळासाठी यापुढे मी खलनायिकेचा विचार करणार नाही. अभिनेत्री म्हणून माझीही यामुळे ग्रोथ व्हायला पाहिजे. त्यासाठी मला वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत.. मला आता टॉम बॉईश भूमिका करायची इच्छा आहे.