'नमुने'तील माझे पात्र पु.ल. देशपांडेंच्या 'बबडू' पात्रावर आधारीत - सुशांत सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 02:57 PM2018-07-27T14:57:29+5:302018-07-27T14:59:19+5:30
बबडू' हा पु.लं.चा लहानपणीचा मित्र होता आणि तो काही परिस्थितीमुळे माफिया डॉन झाला. तो फारच कुविख्यात असला तरी तो अतिशय दयाळू मनाचा होता.
सोनी सब वाहिनीवर 'नमुने' ही मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेत अभिनेता सुशांत सिंग जोगिंदर सिंग फोगटच्या भूमिकेत दिसणार आहे. पु.ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकातील 'बबडू' या पात्रावर आधारीत भूमिका असल्याचे सुशांत सिंगने सांगितले.
सुशांत म्हणाला की, ''बबडू' हा पु.लं.चा लहानपणीचा मित्र होता आणि तो काही परिस्थितीमुळे माफिया डॉन झाला. तो फारच कुविख्यात असला तरी तो अतिशय दयाळू मनाचा होता. तो स्वतःला बाहेरून कणखर दाखवायचा. आम्ही `उपर से सख्त, अंदर से नरम’ हेच प्रोमोमध्ये दाखवतोय. या मालिकेत त्याचे नाव जोगी आहे.'
सुशांतने ही मालिका पु.ल. देशपांडे यांच्या लिखाणातील व्यक्तीवर आधारीत असल्यामुळे लगेचच होकार दिला. त्याला या मालिकेतील जोगीचे पात्र भावले. मला खूप सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका करून कंटाळा आला आहे. म्हणून ही भूमिका माझ्यासाठी योग्य आहे आणि या भूमिकेमुळे माझ्या मुलांना आनंद होईल आणि अर्थातच मलाही, अशी ही भूमिका असल्याचे सुशांतने सांगितले.
या मालिकेतील सहकलाकारांबद्दल त्याने सांगितले की, 'माझे सहकलाकार भन्नाट आहेत. दिग्दर्शन, निर्मिती सगळेच छान आहे. ही काही नेहमीची टीव्ही मालिका नाही. फरिदा ह्या किती ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेत्री आहेत, त्यांच्याबरोबर आणि इतर सर्वच कलाकारांबरोबर काम करणे आनंददायक होते. लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू अशी आशा करतो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, पुलंच्या अपेक्षा पूर्ण करू अशी आशा वाटते.'
'नमुने' मालिकेतील सुशांतची भूमिका प्रेक्षकांना भावेल का हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.