राजगडाची थीम अन् पारंपरिक पेहराव, मायरा वायकूळच्या भावाचं बारसं; काय ठेवलं नाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 10:47 AM2024-12-12T10:47:18+5:302024-12-12T10:47:59+5:30
वायकूळ कुटुंबात छोट्या पाहुण्याचं बारसं अगदी थाटात संपन्न झालं.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिरेतून घराघरात पोहोचलेला छोटी परी म्हणजेच मायरा वायकूळ (Myra Vaikul) आता ताई झाली आहे. मायराच्या आईने काही दिवसांपूर्वीच गोंडस मुलाला जन्म दिला. नुकतंच त्याचं बारसं संपन्न झालं. सध्या हटके नाव ठेवण्याचा ट्रेंड सुरु आहे. मायराच्या भावाचं नावही खूपच खास आहे. चाहत्यांनी या नावाचं खूप कौतुकही केलं आहे. काय आहे छोट्या वायकूळचं नाव आणि कसा पार पडला हा सोहळा वाचा.
वायकूळ कुटुंबात छोट्या पाहुण्याचं बारसं अगदी थाटात संपन्न झालं. यावेळी त्यांनी राजगडाची थीम ठेवली होती. शिवकालीन राजगडाचा स्टेज तयार केला होता. फुलांची तोरणं होती. समोरच फुलांनी समजवलेला सुंदर पाळणा होता. मायराच्या आईने हिरव्या-पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली. आकर्षक दागदागिने घातले होते. तर मायराने त्याच रंगाचं परकर पोलकं घातलं. मायराच्या वडिलांनी पांढऱ्या रंगाचा सदरा पायजमा घातला. तर ज्युनिअर वायकुळलाही पांढऱ्या रंगाचा पेहराव केला होता. त्याच्या कपाळावर चंद्रकोर होती. चौघंही पारंपरिक पेहरावात सुंदर दिसत आहेत.
यानंतर मायराने दोरी खेचत आपल्या लाडक्या भावाचं नाव जगाला दाखवलं. त्यात लिहिलं होतं की,
"आमच्या बाळाच नाव काय ? उंच अमर्याद *आकाशा* तील सूर्याचे *तेज* मी,
*वाऱ्या* च्या सळसळ तृप्तीचा स्पर्श मी,
नितळ निर्मळ *जल- जीवन* मी,
अनंत -अथांग असे *अवकाश* मी,
पंचमहाभूतांनी परिपूर्ण असा मी .... कोण?
अहं ....
' व्योम ' !"
मायराच्या भावाचं नाव 'व्योम' असं ठेवण्यात आलं आहे. 'खूपच सुरेख नाव','खूपच छान कार्यक्रम' अशा कमेंट्स त्यांच्या व्हिडिओवर आल्या आहेत.