'बरसातें- मौसम प्यार का'मधून नौशीन अली सरदारचं ५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:41 PM2023-08-21T19:41:00+5:302023-08-21T19:41:31+5:30
रोमान्स ड्रामाच्या उत्कंठावर्धक कथानकाद्वारे ‘बरसातें - मौसम प्यार का’ मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलेले आहे.
रोमान्स ड्रामाच्या वेगवान कथानकाद्वारे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘बरसातें - मौसम प्यार का’ मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलेले आहे. सर्वार्थाने हार्टब्रेकर रेयांश लांबा (कुशल टंडन) आणि सदगुणी आराधना सहानी (शिवांगी जोशी) यांच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या मन वेधून घेणाऱ्या कथेत मजबूत इच्छाशक्ती असलेल्या दोन व्यक्ती भावनिक गुंतागुतीच्या जाळ्यात अडकलेल्या दिसतात. सध्या मालिकेत प्रेक्षकांना आराधनाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर मयांकचा प्रवेश होताना दिसणार आहे. तो आराधना आणि रेयाशं यांच्या आयुष्यात आणखीच गुंतागुंत निर्माण करताना दिसतो. इतकेच नव्हे तर आपण दत्तक घेतल्याची सत्य माहित झाल्यानंतर ती भावनिकरीत्या मोडून पडते. यामुळे ती पूर्णपणे स्वत:ला हरवून बसते. आपली जैविक आई शोधून काढण्यासाठी ती देहरादूनला जाते आणि आपल्या मनातील भावनिक द्वद्वांची उत्तरे तिला विचारते.
या नाट्यात आणखी भर घालत नौशीन अली सरदारचा मालिकेत प्रवेश झाला आहे. ती आराधनाची जैविक आई, मालिनी खन्नाची भूमिका साकारत आहे. तिला मिमी या नावानेही ओळखले जाते. मालिनी ही एक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी महिला आहे. ती एका मीडिया कंपनीची मालक असून देहरादूनमध्ये तिच्या तीन मुलांचाही सांभाळ करत असते. आराधनाच्या अस्तित्वाबाबत मिमीला जाणीव असते. मात्र, भूतकाळातील पश्चातापामुळे तिच्यासोबत जुळण्याचे धैर्य तिला कधीच गोळा करता आले नाही.
नौशीन अली सरकारचं कमबॅक
‘बरसातें- मौसम प्यार का’ मालिकेच्या माध्यमातून जवळपास पाच वर्षांनंतर दूरचित्रवाणीवर पुनरागमन करताना सुंदर नौशीन अली सरकारने मुक्तपणे आपली उत्सुकता व्यक्त केली. ती म्हणाली, ‘हे माझ्यासाठी घरी परतल्यासारखे आहे. कारण मी माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीचा शुभारंभ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि बालाजी टेलिफिल्मसोबत केला होता. आता याच दोन पॉवरहाऊसेसने निर्माण केलेल्या ‘बरसातें - मौसम प्यार का’ मालिकेच्या माध्यमातून माझे पुनरागमन होत आहे. एकता कपूर यांनी नेहमीच हृदयाच्या तारा छेडणाऱ्या जीवनकथा सादर केलेल्या आहेत. नेमके हेच माझ्यासोबत घडले, जेव्हा या मालिकेचे कथानक मला ऐकवण्यात आले होते. मी लगेच मिमीकडे आकर्षित झाले. मालिनी खन्नाची व्यक्तिरेखा जिवंत करून दाखवणे, हे माझ्यासाठी परिपूर्ण पुनरागमन आहे. या भूमिकेच्या माध्यमातून मला भाव-भावनांच्या विविध छटा दाखवण्याची संधी मिळणार आहे. मालिनीच्या पात्राबद्दल मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, ती खूप करारी आणि महत्त्वाकांक्षी आहे. या सोबतच ती जमिनीशी खूप जुळलेली आहे आणि सर्वांसाठी ती सहृदयी आहे. हा प्रवेश मालिकेत खूप मोठे नाट्य घडवणार आहे हे नक्कीच. ती आराधनाच्या मनातील द्वंद्वांना उत्तरे देणार आहे. यातून त्या दोघींच्याही आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. मालिकेचा पहिला भाग पाहिल्यानंतर एकताची गळाभेट घेण्याची इच्छा झाली. या सुंदर भूमिकेसाठी तिला धन्यवादही म्हणायचे होते.’