आई तुरुंगात तर आता वडील फरार, 'नवा गडी नवं राज्य' च्या चिंगीच्या पालकांचा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 11:30 AM2023-07-02T11:30:05+5:302023-07-02T11:35:02+5:30
आपल्यालाही अटक होईल या भीतीने तिचे वडीलही फरार झालेत. सध्या साईशा मालिकांमध्ये काम करत असून सेटवर सर्वच तिची काळजी घेत आहेत.
'नवा गडी नवा राज्य' या सध्या गाजत असलेल्या मराठी मालिकेतील बालकलाकार चिंगी म्हणजेच साईशा भोईर (Saisha Bhoir) अल्पावधीतच लोकप्रिय झाली. तिच्या गोड अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. साईशा 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये लहान मुलांच्या सेगमेंटमध्ये कॉमेडी करताना दिसत आहे. एवढ्याशा वयात साईशाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. पण याचा फायदा तिच्याच आईवडिलांनी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पैशांच्या हेरगिरीप्रकरणी साईशाच्या आईला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर आता आपल्यालाही अटक होईल या भीतीने तिचे वडीलही फरार झालेत.
साईशा भोईरची आई पूजा भोईर विरोधात गेल्या महिन्यातच एका महिलेने तक्रार केली होती. सोशल मीडियावर ओळख बनवत पूजा भोईरने त्या महिलेकडून बरेच पैसे उकळले होते. यानंतर मुंबईसह नाशिक, लातूरमधूनही अनेकांनी तक्रारी दाखल केल्या. या सर्व तक्रारींनंतर पूजा भोईरला अटक करण्यात आली. ७ जुलैपर्यंत तिला कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पूजा अटकेनंतर तिचा पती म्हणजेच साईशाचे वडील विशांत भोईर फरार झालेत. विशांतने देखील अनेकांना फसवल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत. तसंच लवकरच आर्थिक गुन्हे शाखा हे प्रकरण हाती घेणार आहे.
साईशाच्या आईवडिलांचा मुंबईत आलिशान फ्लॅट आहे. तसंच त्यांच्या घरात २० लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने सापडलेत. साईशाच्या नावाने बरीच गुंतवणूकही करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहेच. सध्या साईशा मालिकांमध्ये काम करत असून सेटवर सर्वच तिची काळजी घेत आहेत. तिला या प्रकरणाबद्दल अद्याप काहीच माहिती देण्यात आलेली नाही.
आठवड्याला १०.१० टक्के नफा!
पुजाचा ऑप्शन्स स्ट्रॅटेजी मॉडेल नावाने गुंतवणुकीचा व्यवसाय असून त्यावर दर आठवड्याला १०.१० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष तिने एका व्यावसायिकाला दाखवले. त्यानुसार त्यांनी आणि पत्नीने ६ आणि १० मिळून १६ लाख रुपये पूजाच्या कंपनीत गुंतवले. तिने ५ डिसेंबर २०२२ रोजी एकूण नफ्यातील ३० टक्के कमिशन कापत उरलेले पैसे दोघांच्याही बचत खात्यावर जमा केले. दुसरा महिन्यातही तिने परतावा दिला. मात्र त्यानंतरच्या परताव्याबाबत ती टाळाटाळ करू लागली आणि त्यामुळे व्यवसायिकाने १० फेब्रुवारी २०२३ रोजी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. पूजा ने त्यांना १७ फेब्रुवारीला दोन चेक नोकरामार्फत एस एसएआय ॲडव्हायझर इन्व्हेस्टमेंट या नावाने दिले. २८ फेब्रुवारी पर्यंत रक्कम जमा न झाल्यास ते चेक बँकेत भरायला पूजाने पत्कींना सांगितले जे बाऊन्स झाले.
मराठी मालिकांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे “साईशा भोईर”. साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा आणि तिचे कुटुंब कल्याणला वास्तव्यास आहे. तिचे वडील विशांत भोईर यांना म्युजिकची आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे. साईशा युट्युब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर नेहमी आपले व्हिडीओज अपलोड करत असते. तिच्या या वेगवेगळ्या व्हिडिओजना चाहत्यांकडून मोठी पसंती देखील मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नृत्य, अभिनय याशिवाय साईशा कुकिंग करतानाचे व्हिडीओज देखील अपलोड करताना दिसते. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.