एकता कपूरच्या नव्या वेबसीरिजवरून नवा वाद; अहिल्याबाईंच्या नावाचा गैरवापर केल्यानं धनगर समाज संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 05:24 PM2020-09-06T17:24:34+5:302020-09-06T17:26:49+5:30
टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूर आणि वादांचे जुने नाते आहे.
टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूर आणि वादांचे जुने नाते आहे. आता एकता कपूरची आगामी वेबसीरिज ‘व्हर्जिन भास्कर 2’ने नवा वाद ओढून घेतला आहे. अहिल्याबाईंच्या नावाचा अनुचित वापर केल्याने धनगर समाज संतप्त झाला असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या समाजाने केली आहे.
‘व्हर्जिन भास्कर 2’ या एकता कपूरच्या वेबसीरिजचा ट्रेलर अलीकडे रिलीज झाला होता. यानंतर गेल्या 29 ऑगस्टला ऑल्ट बालाजीवर ही बोल्ड वेबसीरिज रिलीज झाली. या सीरिजमध्ये गर्ल होस्टेलला अहिल्याबाई यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच याठिकाणी काही अश्लिल प्रसंग दाखवण्यात आले आहे, यावर धनगर समाजाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एका अश्लिल वेबसीरिजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा उल्लेख आक्षेपार्ह असून देशवासियांच्या भावना दुखावणारा असल्याचे धनगर समाजाच्या नेत्या निहिराका खोंदले यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रकरणाची दखल घेत, एकता कपूरविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बबनराव मदने यांनी याप्रकरणी कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
‘व्हर्जिन भास्कर 2’ची कथा
‘व्हर्जिन भास्कर 2’ ही एक बोल्ड सीरिज आहे. यात अभिनेता अनंत जोशी मुख्य भूमिकेत आहे. त्यात त्याने भास्कर त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये भास्कर आणि त्याच्या व्हर्जिनिटीची कहाणी दाखवली गेली होती. दुस-या सीझनमध्ये हीच कथा समोर नेत देशातील पुरूषांच्या सेक्युअॅलिटीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.