झी मराठीवर आता उलगडणार टिळकांची गाथा, हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:24 PM2022-12-14T18:24:00+5:302022-12-14T18:24:45+5:30
Lokmanya : लोकमान्य ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
झी मराठी वाहिनीवर नवनव्या मालिकांच्या घोषणा होत आहेत. नुकताच दोन नव्या मालिका सुरु होणार असल्याच्या घोषणा केल्या आहेत. या मालिकांचे विषय सुद्धा भन्नाट आणि ऐतिहासिक आहेत. झी मराठीवर सुरु होणारी एक मालिका म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे.
लोकमान्य या मालिकेत लोकमान्य टिळक यांची भूमिका अभिनेता क्षितीश दाते साकारणार असून त्यांच्या पत्नीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी साकारणार आहे. नुकताच लोकमान्य मालिकेचा प्रोमो समोर आला असून चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद या प्रोमोला मिळत आहे.
अभिनेता क्षितीश दाते 'धर्मवीर' चित्रपटातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं खूपच कौतुक झाले होते. आता क्षितीशला लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. तर स्पृहा जोशीने या आधी झी मराठीवरील 'उंच माझा झोका' मालिकेतील रमाबाई रानडे यांची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. तिला आता पुन्हा ऐतिहासिक भूमिकेत पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. लोकमान्य ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता प्रसारीत होणार आहे.