स्त्रीप्रधान मालिका 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 03:45 PM2023-10-02T15:45:18+5:302023-10-02T15:49:18+5:30
सहा महिलांची गमतीशीर कथा या मालिकेतून समोर येणार आहे.
'सोनी मराठी' वाहिनी नेहमीच नवनवीन कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. अशातच स्त्रीप्रधान संस्कृतीचे गोडवे गाणारी एक नवी कोरी मालिका घेऊन ही वाहिनी सज्ज झाली आहे. 'खुमासदार नात्यांच्या गोडा मसाला' असे नाव असलेली मालिका ३ ऑक्टोबरपासून फक्त 'सोनी मराठी' वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. पुरुषाची जात वाईट असते असं म्हणणाऱ्या तेंडुलकर घरातील स्त्रियांच्या मनाचा खेळ या मालिकेतून उलगडणार आहे. सहा महिलांची गमतीशीर कथा या मालिकेतून समोर येणार आहे. अनुज साळुंखे व महिमा म्हात्रे म्हणजेच समर व सानिकाची फ्रेश जोडी मालिकेतून पहिल्यांदाच रुपेरी पडदा गाजवायला येणार आहे.
या स्त्रीप्रधान कथानक असलेल्या मालिकेचं लेखनही लेखिका श्वेता पेंडसे व रोहिणी निनावे यांनी केलं आहे. इतकंच नव्हे तर या स्त्रीप्रधान मालिकेचं टायटल सॉंगही कोकण कलेक्टिव्ह या महिला ग्रुपने स्वरबद्ध केलं आहे. या मालिकेतील सहा स्त्रिया सर्वसामान्य स्त्रिया नसून तिखट मसाल्यांच्या यादीत यांची नाव अचूक बसतील अशा आहेत, असं असलं तरी हा मसाला कुटल्यानंतर त्याचा गोडा मसाला तयार होतो, हे ही तितकंच खरं आहे.
पुरुषांचा तिरस्कार करणाऱ्या या स्त्रिया म्हणजेच 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' मालिकेतील नयना आपटे, रेवती लिमये, शर्वनी पिलये, महिमा म्हात्रे, सीमा देशमुख, दुर्वा देवधर आहेत. प्रत्येक पात्र साकारणारी स्त्री ही मसाल्यांप्रमाणे तिखट आहे. म्हणजेच जस की, या मालिकेतील तेंडुलकरांच्या घरातील सानिका जरी शेंडेफळ असली तरी तिची तऱ्हा ही लाल मिरचीसारखी आहे. तर चाळिशीतल्या पल्लवी सदावर्तेची लवंग प्रमाणे तऱ्हा आहे. तर तिशीतल्या दिव्याची काळीमिरी सारखी तऱ्हा आहे. अशा या तिखट तऱ्हा असणाऱ्या महिला त्यांच्या घरी पुरुषांना स्थान टिकवू देतील का हे पाहणं रंजक ठरेल. मालिकेत अनुज साळुंखे, विनय एडेकर, अमित खेडेकर, अजिंक्य जोशी या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. या मालिकेमुळे एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.