आषाढी एकादशीनिमित्त झी मराठीवर नव्या मालिकेची घोषणा 'सावळ्याची जणू सावली', प्रोमो रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:53 AM2024-07-17T10:53:34+5:302024-07-17T10:56:14+5:30
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर झी मराठीने नवीन मालिकेची घोषणा केलीय. या मालिकेत वेगळी कथा बघायला मिळणार आहे (Savlyachi Janu Savali)
आज आषाढी एकादशी. विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीपायी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोभावे पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारकरी विठ्ठलाची भक्ती करण्यात तल्लीन झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्तझी मराठीवर नव्या मालिकेची घोषणा झालीय. या मालिकेचं नाव 'सावळ्याची जणू सावली'. या मालिकेचा अनाऊन्समेंट प्रोमो झी मराठीने नुकताच शेअर केलाय.
झी मराठीवरील नव्या मालिकेची घोषणा
झी मराठीने नुकतंच सोशल मीडियावर त्यांच्या नवीन मालिकेची घोषणा केलीय. 'सावळ्याची जणू सावली' असं या मालिकेचं नाव आहे. मालिकेच्या प्रोमोत विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे. या मूर्तीसमोर पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेली एक मुलगी दिसत आहे. हा प्रोमो शेअर करुन कॅप्शन लिहिण्यात आलंय की, 'पांडुरंगाची परमभक्त ती,
सुरेल तिचा गळा, तुम्हालाही लागेल तिच्या गोड आवाजाचा लळा'. आता या मालिकेत प्रमुख भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
काय असणार नवीन मालिकेची कथा
या मालिकेचा प्रोमो रिलीज होताच अनेकांनी कमेंटमध्ये ही मालिका झी बांगलावरील एका बंगाली मालिकेचा रिमेक असल्याचं सांगितलं आहे. 'कृष्णकोली' असं मूळ बंगाली मालिकेचं नाव आहे. या मालिकेची कथा अशी होती की, एक मुलगी कृष्णाची भक्त आहे. ती दिसायला सावळी आहे. कृष्णाचा रंगही सावळा असल्याने ती तिच्या रंगाचा स्वीकार करते. या मुलीची मोठी स्वप्न असतात. परंतु तरीही रंगावरुन तिला समाजाचा सामना करावा लागतो. असं कथानक या मालिकेचं आहे. झी मराठीवर सुरु होणाऱ्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत कोणते कलाकार दिसणार, मालिका कधीपासून सुरु होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.