'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, शाळेच्या नाटकामुळे दीपा आणि कार्तिकमधील मिटेल का दुरावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 13:25 IST2022-04-28T13:24:37+5:302022-04-28T13:25:09+5:30
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, शाळेच्या नाटकामुळे दीपा आणि कार्तिकमधील मिटेल का दुरावा?
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिका गेल्या कित्येक आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील दीपा, कार्तिक, कार्तिकी आणि दीपिका या पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. हे चौकोनी कुटुंब पुन्हा कधी एकत्र येणार याची चाहते वाट पाहत आहेत. लवकरच हे चौकोनी कुटुंब पूर्ण होणार आहे. तेही शाळेच्या नाटकामुळे. त्यानंतर दीपा आणि कार्तिकमधील दुरावा मिटेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत प्रसारीत झालेल्या भागात पाहायला मिळालं की, दीपिका आणि कार्तिकी दीपा - कार्तिकला नाटकात काम करण्यासाठी हट्ट करतात. त्यात आयशाने कार्तिकला दोन दिवसात लग्न करायचे असे ठणकाहून सांगितले. त्यामुळे कार्तिकला दीपासोबत काम करायचे नसते. तो दीपाला तू काम करण्यास नकार दे असे सांगतो. कारण जर त्याने नकार दिला तर दीपिका त्याच्यावर रागवेल आणि घर सोडून जाईल, अशी भीती कार्तिकला असते. कार्तिकी समजदार आहे, असे कार्तिक दीपाला सांगतो. त्यानंतर दीपा नाटकात काम न करण्याचा निर्णय घेते. कार्तिकीला आपल्याला अर्जंट गावी जायचे आहे असे सांगते. तितक्यात दीपाचे वडील तिथे येतात. कार्तिकी आईला नाटकात करण्यासाठी सांगा असे म्हणते. त्यावर बाबा दीपाची समजूत काढतात. त्यामुळे आता दीपा आणि कार्तिकही नाटकात काम करताना दिसणार आहे.
दरम्यान नुकताच नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात कार्तिक आणि दीपा राम सीतेच्या भूमिकेत दिसत आहेत. तर दीपिका व कार्तिकी लव कुशच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यात पाहायला मिळत आहे की, राम सीतेला म्हणतात की हे आपली अपत्ये आहेत. त्यावर सीता म्हणतात की हो प्रभू, त्यानंतर लव कुश म्हणताना दिसतात की, आम्ही तुम्हाला विनंती करतो. पिताश्री मातेसह आमचा स्वीकार करा. आम्हाला पित्याचे छत्र आणि मातेचा सहवास, दोन्ही हवे आहे. हे पाहून सौंदर्या भावुक होतात. या नाटकानंतर दीपा आणि कार्तिक यांच्यातील दुरावा मिटेल का, ते चौघे एकत्र येतील का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.