'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवीन ट्विस्ट, शालिनीसमोर उघडकीस येणार गौरी आणि माईंचा सगळा प्लान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:08 IST2022-04-09T14:07:59+5:302022-04-09T14:08:56+5:30
Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवीन ट्विस्ट, शालिनीसमोर उघडकीस येणार गौरी आणि माईंचा सगळा प्लान
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. गौरी वेश बदलून सध्या शिर्के पाटील यांच्या घरात राहत आहे आणि घरातल्या सगळ्यांनाच चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळत आहे. गौरीला कड्यावरून ढकलण्यामागे कोणाकोणाचा हात आहे, हे जाणून घेण्यासाठी गौरीने हा वेश धारण केला आहे. यात तिला माईंची साथ मिळाली आहे. दरम्यान आता मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शालिनीसमोर गौरी आणि माईंचा सगळा प्लान उघडकीस येणार आहे.
नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात शालिनी आणि देवकी घराबाहेर रात्री सगळे झोपलेले असताना माई आणि गौरीला घराबाहेरील झाडापाशी बोलताना पाहतात. त्यामुळे माईंनीच तोतया गौरीला घरी आणले आहे, असे त्यांचे मत होते. त्या दोघींना यामागचे सत्य जाणून घ्यायचे असते.
दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, माईंच्या वेशात शालिनी झोपायची एक्टिंग करते. तेव्हा तिथे गौरी येते आणि माई सूप आणलं आहे, असे सांगते. दरवाजा लावते आणि म्हणते की, माई आपले आधीचे दिवस परत येतील का ओ...खऱ्याच गौरीला खोट्या गौरीचं नाटक करावं लागतंय. पण ठीक आहे. आपण त्यातूनही बाहेर पडू. येते मी असे बोलून गौरी माईंच्या खोलीतून बाहेर जाते.
मात्र हे ऐकून शालिनीला धक्का बसतो. शालिनीसमोर गौरी आणि माईंचा सगळा प्लान उघडकीस येतो, आता शालिनी काय करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.