'कार्यक्रमातून एक्झिट पण...' निलेश साबळेंचा फ्युचर प्लॅन; डॉक्टर आता नव्या भूमिकेत दिसणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:54 AM2024-02-26T11:54:38+5:302024-02-26T11:55:18+5:30
निलेश साबळेंशिवाय कार्यक्रम कसा होणार असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. डॉक्टरांच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय याचं उत्तर त्यांनी नुकतंच दिलं आहे.
हसताय ना? हसायलाच पाहिजे असं म्हणत 'चला हवा येऊ द्या'ची सुरुवात करणारे डॉ निलेश साबळे (Dr Nilesh Sabale) कार्यक्रमातून एक्झिट घेत आहेत. गेल्या १० वर्षांपासून ते या शोचा भाग आहेत. लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशा प्रत्येक भूमिका त्यांनी उत्तम साकारल्या. मात्र आता येत्या आठवड्यापासूनच ते दिसणार नाहीत म्हणल्यावर चाहतेही निराश झालेत. निलेश साबळेंशिवाय कार्यक्रम कसा होणार असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. डॉक्टरांच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय याचं उत्तर त्यांनी नुकतंच दिलं आहे.
निलेश साबळे बऱ्याच काळापासून छोटा पडदा गाजवत आहे. 'चला हवा येऊ द्या' शो महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लोकप्रिय करण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. मात्र आता त्यांनी कार्यक्रमाला रामराम केला आहे. याचं कारण सांगताना ते म्हणाले, "येत्या आठवड्यापासून मी या कार्यक्रमाचा भाग नाही. काही गोष्टी मला नवीन करायच्या होत्या. सिनेमा, वेबसीरिजचं काम सुरु आहे. तसंच तब्येतीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. म्हणून मी कार्यक्रमातून बाहेर पडलोय. प्रेक्षकांना हसवण्याचं काम परमेश्वराने शिकवलंय. लोकांना आयुष्यभर हसवत राहणारच आहे. एका कार्यक्रमातून जरी एक्झिट झालेली असली तरी नवीन काहीतरी घेऊन तुमच्यासमोर नक्कीच येईल. सध्या काही ठोस ठरलेलं नाही म्हणून ते शेअर करु शकत नाही. पण हे निश्चित आहे जे तुम्ही आतापर्यंत अनुभवलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं आणि खूप छान मी नक्कीच तुमच्यासाठी आणेल." 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, "ज्या कार्यक्रमाने मला खूप काही दिलं त्याचा मी कायमच ऋणी राहीन. १० वर्ष हा कार्यक्रम चालला. सर्व सहकलाकारांनीही मला उत्तम साथ दिली. पण आता निरोप घेतोय. बाकी मी करिअरमध्ये एकच व्यावसायिक नाटक केलं होतं. नाटकाच्या ऑफर्स आहेत पण सध्या नाटक नाही तर सिनेमाचं काम चालू आहे. तो लवकरच पाहायला मिळेल. याशिवाय वेबसीरिजही करत आहे."