Nishi Singh Passed Away : ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री निशी सिंह यांचं निधन, तीनच दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 10:13 AM2022-09-19T10:13:47+5:302022-09-19T10:17:18+5:30
Nishi Singh Bhadli Passed Away : गेल्या चार वर्षांपासून निशी आजारी होत्या. अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे 16 सप्टेंबरला निशी सिंह यांनी त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता.
Nishi Singh Bhadli Passed Away : ‘इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचेल्या अभिनेत्री निशी सिंह भादली (Nishi Singh Bhadli) यांचं निधन झालं आहे. त्या 50 वर्षांच्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून निशी आजारी होत्या. 17 सप्टेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. काल दुपारी 3 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती संजय सिंह भादली यांनी निशी सिंह यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे 16 सप्टेंबरला निशी सिंह यांनी त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, लेखक-अभिनेते संजय सिंह भादली आणि दोन मुलं असा परिवार आहे.
निशी यांना मे महिन्यात पॅरलिसिसचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांना घशाचा गंभीर संसर्ग झाला. यामुळे त्यांना काहीही खाता येत नव्हते. त्या फक्त द्रवपदार्थ खाऊ शकत होत्या.
निशी सिंह यांनी हिटलर दीदी, कुबूल है,इश्कबाज आणि तेनाली रामा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ‘कुबूल है’ या मालिकेत निशी सिंह यांनी हसिना बीवीची भूमिका साकारली होती. तसेच ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातही निशी सिंह यांनी काम केलं होतं. निशी यांनी कमल हसन आणि मामूटी यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केली होती. आहे.
पतीने पूर्ण केली अखेरची इच्छा
तीनच दिवसांपूर्वी निशी सिंह यांनी वाढदिवस साजरा केला होता. त्यांचे पती संजय यांनी सांगितले की, परवा रात्री11 वाजता मुसळधार पाऊस पडत होता. त्याचदरम्यान तिची प्रकृती बिघडली. त्याआधी ती रूग्णालयात भरती होती. 110 दिवस ती रूग्णालयात होती. मे महिन्यापासून 2 सप्टेंबरपर्यंत ती रूग्णालयात होती. 2 तारखेला तिला डिस्चार्ज मिळाला होता. 16 तारखेला तिचा वाढदिवस होता. आम्ही घरीच सेलिब्रेट केला. तिला काहीही बोलता येत नव्हतं. पण त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. तिला बेसनाचे लाडू खूप आवडायचे. मला बेसनाचे लाडू खायचे आहेत, असं ती म्हणाली. मी तिला लाडू खाऊ घातला. दुपारपर्यंत चांगली होती. संध्याकाळी तिची प्रकृती बिघडू लागली. तिच्या रक्तात संसर्ग होता. यामुळे मेंदू आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाला होता. यामुळेच तिचा मृत्यू झाला, असं संजय यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितलं.