हॉटेल रुममध्ये नितेश पांडेचा झाला मृत्यू, स्टाफकडून मागवलं होतं जेवण, नेमकं काय घडलं त्या रात्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:31 PM2023-05-25T12:31:12+5:302023-05-25T12:31:22+5:30
Nitesh Pandey : अनुपमा फेम अभिनेता नितेश पांडेचं कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले
अनुपमा फेम अभिनेता नितेश पांडे(Nitesh Pandey)चं कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. ५१वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन जगतात शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनानंतर सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
नितेश पांडे नाशिक येथील इगतपुरीमध्ये शूटिंगसाठी गेले होते. तिथेच कार्डिअॅक अरेस्टमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं? याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे. एबीपीच्या माहितीनुसार, नितेश पांडे इगतपुरीमधील हॉटेल ड्यू ड्रॉप येथे थांबले होते. मंगळवारी(२४ मे) संध्याकाळी त्याने जेवणाची ऑर्डरही दिली होती.
रात्री २ वाजता दाखल केले होते रुग्णालयात
नितेश पांडेनी दिलेल्या जेवणाची ऑर्डर देण्यासाठी आलेल्या हॉटेल स्टाफने त्याच्या रुमची बेल वाजवली. मात्र बराच वेळ आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मास्टर चावीच्या सहाय्याने हॉटेल रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी नितेश पांडे बेशुद्ध अवस्थेत आढळला. रात्री २ वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
मालिकेसह चित्रपटातही केले होते काम
नितेश पांडेने जवळपास २५ वर्षे कलाविश्वात काम केले होते. 'तेजस', 'साया', 'मंजिलें अपनी अपनी', 'जस्तजू', 'हम लड़कियाँ', 'सुनैना', 'कुछ तो लोग कहेंगे', 'एक रिश्ता पार्टनरशिप का', 'महाराजा की' यांसारख्या मालिकेत त्याने काम केले आहे. तो 'अनुपमा'मध्ये धीरज कपूरच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने 'बधाई दो', 'मदारी', 'दबंग २' सारख्या चित्रपटातही काम केले.