नीतिश भारद्वाज यांचे आरोप IAS पत्नीने फेटाळले; म्हणाल्या, 'लवकरच सत्य बाहेर येणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 03:19 PM2024-02-16T15:19:34+5:302024-02-16T15:20:55+5:30
'महाभारत' फेम नीतिश भारद्वाज यांनी पत्नीवर लावलेले आरोप खोटे?
ज्येष्ठ अभिनेते नीतिश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांनी पत्नीविरोधात मानसिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. तसंच आपल्या मुलींनाही भेटू दिलं जात नसल्याचा आरोप केला. सध्या नीतिश भारद्वाज पत्नीपीडित अत्याचारामुळे चर्चेत आहेत. त्यांची पत्नी स्मिता भारद्वाज या मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस(IAS) अधिकारी आहेत. नीतिश भारद्वाज यांनी भोपाळ पोलिस कमिश्नरकडे तक्रार दाखल केली आहे. तर आता मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता भारद्वाज यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
एकेकाळी टीव्हीवर गाजलेल्या महाभारत या लोकप्रिय मालिकेत नीतीश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. नीतीश भारद्वाज यांनी पत्नीवर लावलेल्या आरोपांनंतर स्मिता भारद्वाज यांच्या वकिलांकडून स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. त्यांचे वकील चिन्मय वैद्य यांनी सर्व आरोप खोटे आणि अपमानकारक असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, "नीतीश भारद्वाज यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. हे व्यक्तिगत प्रकरण आहे आणि यामध्ये माझ्या क्लाएंटच्या मुलांचाही समावेश आहे. तसंच प्रकरण सध्या कोर्टात आहे. आम्ही लवकरच अधिकृत स्टेटमेंट जारी करु ज्यामध्ये सगळं सत्य सांगितलं जाईल. या आठवड्याच्या शेवटी आम्ही स्टेटमेंट जाहीर करु."
नीतीश भारद्वाज यांनी तक्रारीत असेही म्हटले की, २०१८ मध्ये त्यांनी आणि पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरु असुनही त्यांच्यापासून दूर गेलेली त्यांची पत्नी आपल्या जुळ्या मुलींना भेटू देत नाही. मुंबई फॅमिली कोर्टातही त्यांनी लेखी तक्रार केली आहे. नीतीश भारद्वाज आणि स्मिता यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली होती आणि २०१८ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.अद्याप त्यांचा घटस्फोट झाला नसून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.