"सगळ्यांना त्याग करणारी 'श्यामची आई' हवी असते", निवेदिता सराफ असं का म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 04:45 PM2023-10-21T16:45:19+5:302023-10-21T16:46:05+5:30
लग्नानंतर १४ वर्ष ब्रेक घेतल्यानंतर निवेदिता सराफ यांनी नाटकातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. सध्या 'मी स्वरा आणि ते दोघं', 'वाडा चिरेबंदी' नाटकांबरोबरच 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतही काम करत आहेत.
निवेदिता सराफ या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. दमदार अभिनय आणि उत्कृष्ट भूमिका साकारुन त्यांनी ८०-९०चं दशक गाजवलं. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावलं. निवेदिता सराफ यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात करिअर करायला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लग्नानंतर काही वर्ष ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी अभिनयात पुनरागमन केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी त्यांच्या भूमिकांबद्दल भाष्य केलं.
लग्नानंतर १४ वर्ष ब्रेक घेतल्यानंतर निवेदिता सराफ यांनी नाटकातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. सध्या 'मी स्वरा आणि ते दोघं', 'वाडा चिरेबंदी' नाटकांबरोबरच 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतही काम करत आहेत. या भूमिकांविषयी त्यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "प्रत्येक भूमिकेत तुम्हाला काहीतरी सापडत असतं. प्रत्येक भूमिकेत आपल्याला वेगवेगळे कांगोरेही दिसत असतात. रत्नमाला मोहिते ही भूमिका करारी, संस्कृती परंपरा सांभाळणारी व्यक्तिरेखा आहे. १२०० रुपये घेऊन मुंबईत येऊन मोठा व्यवसाय उभी करणारी ती व्यक्तिरेखा आहे. किंवा वाडातील वहिनी असेल.जी म्हणते की आता माझी वेळ आलीये मला मान द्या. पण, तिचं सगळ्यांवर प्रेम आहे. सगळ्यांवर तिचा जीव आहे."
"नाटकातील मंजुषा रानडे असेल...ती स्वार्थी वाटते. पण, मला कधी आयुष्यात स्वत:ला अग्रस्थानी ठेवायची संधीच मिळाली नाही, असं ती म्हणते. हे एका स्त्रीसाठी केवढं मोठं वाक्य आहे. कारण, आपल्याला आई म्हटलं की ती श्यामच्या आईसारखीच हवी असते. जी सगळा त्याग करू शकते. हे मंजुषा रानडेचं म्हणणं आहे, ते खूप छान आहे," असंही त्यांनी सांगितलं.