बिग बॉसच्या सेटवर उडाला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अनेकांनी लावला नाही मास्क, पाहा हा व्हिडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 02:14 PM2021-02-22T14:14:18+5:302021-02-22T14:15:22+5:30
बिग बॉसच्या सेटवर कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवले असल्याचे दिसून आले.
कोरोनाचे नियम पायदळी तुडवत अनेकजण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. तसेच सरकारने अनेकवेळा सांगूनही सार्वजनिक ठिकाणी लोक मास्क लावत नाहीयेत, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. बिग बॉसच्या सेटवर देखील अशाच गोष्टी पाहायला मिळाल्या.
गेल्या 20 आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या बिग बॉसच्या या सीझनला अखेर विजेता मिळाला. राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अखेर रुबीना दिलैकने बाजी मारत ती बिग बॉस 14व्या सीझनची विजेता ठरली तर राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला.
बिग बॉसच्या फिनालेचे काल चित्रीकरण झाले. या फिनालेला बिग बॉस 14 मधील सगळेच स्पर्धक आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खान उपस्थित होता.या कार्यक्रमाच्या सेटवरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सेटवर आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. राहुल वैद्य उपविजेता ठरल्यानंतर अनेकजण अलिंगन देऊन त्याला शुभेच्छा देत असल्याचे दिसत आहे. त्यामधील अनेकांनी तोंडाला मास्क देखील लावलेला नाहीये.
या व्हिडिओत एका ठिकाणी आपल्याला विनामास्क कोणालाही परवानगी नाही असा बोर्ड दिसत आहे. पण असे असले तरी अनेकजण मास्क लावत नसल्याचे दिसून आले आहे. सेटवर प्रचंड गर्दी असून कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवले गेले असल्याचे दिसून येत आहे.
बिग बॉस विजेत्याला ट्रॉफी आणि 50 लाख रोख रक्कम मिळणार होती. मात्र ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली. कारण एका टास्कमध्ये घरातील सदस्य राखी सावंत या रकमेपैकी 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडली. त्यामुळे विजेती रुबीनाच्या वाट्याला 44 लाख रुपये आलेत. ज्यावेळी राखी घराबाहेर पडली त्यावेळी सलमानने राखीला विचारले होते की, तुला काय वाटते बिग बॉस कोण जिंकेल त्यावेळी रूबीना जिंकली पाहिजे, असं मला वाटतं असं राखी म्हणाली होती. बिग बॉस सीझन 14 च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात सलमान खानने आपल्या शैलीत केली. सर्व स्पर्धकांच्या नातेवाईकांनी या महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच अभिनेता रितेश देशमुख देखील बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित होता.