नुपूर दैठणकरची 'बाजी'मधून रसिकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 04:33 PM2018-07-23T16:33:58+5:302018-07-23T16:43:06+5:30

पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे.

 Nupur Daithankar Will be Seen In 'Baji' Tv Serial | नुपूर दैठणकरची 'बाजी'मधून रसिकांच्या भेटीला

नुपूर दैठणकरची 'बाजी'मधून रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ असणारी व उत्कंठावर्धक कथा असलेली ‘बाजी’ही नवीन मालिका ३० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी मराठी पुन्हा एकदा शंभर भागांचीच मर्यादित कथा प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. थोडीशी गो. नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांची जी शैली आहे त्या पद्धतीची ही कथा आहे आणि या मालिकेत अभिजीत श्वेताचंद्र सोबत नुपूर दैठणकर ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

बालपणापासून कलेचा वारसा लाभलेली आणि कलेविषयी प्रेम असणारी क्षत्रिय नृत्यांगना नुपूर दैठणकर आता छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील बाजी या मालिकेत ती हिराचं पात्र साकारणार आहे. या मालिकेचं चित्रीकरण पुणे, भोर, सातारा आणि सासवड येथे झालं आहे. ही मालिका प्रामुख्याने पेशवाईच्या उत्तरार्धावर आधारित आहे. यात १७७० मधील अनेक खऱ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. त्यामध्ये बिनीवाले, कोतवाल, कात्रजचा विष प्रयोग, गोदामाला आग, गणपतीच्या हाराची चोरी आदींचा समावेश आहे. यामध्ये शेराचं पात्र प्रखरसिंग तर बाजीचं पात्र अभिजित श्वेताचंद्र साकारणार आहे. संतोष कोल्हे यांनी या मालिकेसाठी खूप कष्ट घेतल्याचे नुपूरने सांगितले. नुपूर म्हणाली, "ही काल्पनिक कथा आहे. यात बाजी व हिराची प्रेमकथा दाखवली आहे. यातील प्रत्येक पात्राला वेगवेगळे कंगोरे आहेत. यात मी लावण्यवती, धाडसी, जिद्दी स्वराज्याच रक्षण करण्यास मागेपुढे न पाहणारी आणि घोडेस्वारी व तलवारबाजी करणारी दाखवली आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे."
 

Web Title:  Nupur Daithankar Will be Seen In 'Baji' Tv Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.