ओम राऊत घेणार ‘शक्तिमान’ची जबाबदारी!, Superhero रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 09:59 AM2022-07-11T09:59:17+5:302022-07-11T10:00:20+5:30
१९९७ ते २००० या काळात डीडी नॅशनलवर प्रसारित होणारी आणि लहान मुलांपासून ते युवा व वृद्धांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडली होती.
१९९७ ते २००० या काळात डीडी नॅशनलवर प्रसारित होणारी आणि लहान मुलांपासून ते युवा व वृद्धांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडणारी भारतीय सुपरहीरो ‘शक्तिमान’ ही मालिका आता रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे.
टीव्हीवर ‘शक्तिमान’ ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंटरनॅशनलनेच ही घोषणा गेल्या महिन्यात केली आहे. आता हा सिनेमा मोठ्या स्तरावर बनणार असून, तीन भागांत बनणाऱ्या या सिनेमाची जबाबदारी ‘तान्हाजी : दी अनसंग हीरो’ व आगामी ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतवर टाकण्याची तयारी सुरू झाली आहे.
या ट्रायोलॉजीच्या मेकर्सने याबाबत ओम राऊतशी संपर्क साधला असून, ‘आदिपुरुष’नंतर तो या सिनेमाकडे वळणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या चित्रपटात शीर्षक भूमिका रणवीर सिंगने साकारावी अशी इच्छा मेकर्सची आहे. त्यामुळे, सगळे गणित जुळले तर रणवीर सिंग ‘पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री’ असा परिचय देताना दिसेल.