बाबो..!, रितेश देशमुख स्वतःच्या लग्नात तब्बल ८ वेळा पडला होत्या जेनेलियाच्या पाया, वाचा हा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 04:33 PM2021-07-30T16:33:12+5:302021-07-30T16:33:35+5:30
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाने नुकतेच सुपर डान्सर ४ शोमध्ये हजेरी लावली.
बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सरच्या चौथ्या सीझनमधील आगामी वीकेंडच्या ‘शादी स्पेशल’ भागात या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. सर्व स्पर्धकांनी काही सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म केले, त्यापैकी स्पर्धक अनीश तट्टीकोटा आणि त्याचा सुपर गुरु आकाश शेट्टी यांनी ‘माही वे’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्म करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
जेनेलिया देशमुख म्हणाली, “क्या बात है! तुमचा परफॉर्मन्स पाहून मला माझ्या विवाह सोहळ्याची आठवण झाली!” पुढे ती म्हणाली, “आपण आता विवाह सोहळ्याला आधुनिकतेचा रंग देऊन एका पार्टीचेच स्वरूप त्याला दिलेले असले, तरी मला पारंपरिक विवाह सोहळा आवडतो आणि माझ्या सुदैवाने ते सर्व विधी मी अनुभवले. माझ्यासाठी प्रत्येक विधी आनंददायक होता. निरोपाच्या वेळी तर मी फारच भावुक झाले होते. पण, एकंदरित आम्हा सर्वांना या पारंपरिक सोहळ्यात खूप मजा आली होती.”
अनीश आणि आकाशच्या परफॉर्मन्सचे कौतुक करताना जेनेलिया असे देखील म्हणाली की, त्या विवाह सोहळ्यादरम्यान विधींचा भाग म्हणून रितेशने तब्बल आठ वेळा जेनेलियाला वाकून नमस्कार केला होता.त्या दोघांचा परफॉर्मन्स पाहून रितेश देशमुख तर काही वेळ निःशब्द होऊन गेला होता. त्याने आकाशच्या कोरिओग्राफीचे कौतुक केले.
रितेश देशमुख म्हणाला, “अप्रतिम! मला इथे बसून हा उत्कृष्ट परफॉर्मन्स प्रत्यक्ष बघता आला हे मी माझे भाग्यच मानतो. तुम्ही दोघांनी मिळून एक मस्त माहोल उभा केलात. हे केवळ गाणे किंवा कोरिओग्राफी इतकेच नाहीये. या डान्सने मला अशी अनुभूती दिली की जणू एका विवाह सोहळ्यात माझ्या एखाद्या आप्तेष्टाने आग्रहाने माझे स्वागत केले आहे.”