‘प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात…’ ओंकारने थेट हास्यजत्रेच्या स्टेजवरच प्रियदर्शिनीसोबत केलं फ्लर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:17 PM2023-03-29T15:17:49+5:302023-03-29T15:25:36+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सध्या सर्व मराठी रसिकांचा आवडता विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घराघरात आवर्जुन पाहिला जातो. या कार्यक्रमातील कलाकारांना अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. आज हे कलाकार स्टार झालेत. सेटवर सर्व कलाकारांची छान मैत्रीही झाली आहे. दरम्यान काही दिवसांपासून प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) आणि ओंकार राऊत (Onkar Raut) यांच्या एका रोमँटिक फोटोमुळे त्यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा रंगू लागली. मात्र आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं दोघांनी स्पष्ट केलं. दरम्यान आता ओंकारने थेट हास्यजत्रेच्या स्टेजवरच प्रियदर्शिनी सोबत फ्लर्ट केलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कार्यक्रमातील एका स्किटमध्ये ओंकार राऊत प्रियदर्शिनी सोबत फ्लर्ट करताना दिसतोय. स्किटमध्ये प्रियदर्शिनी लाजत लाजत म्हणते, 'मी इथे ऑफ चेहऱ्याने बसले असते ना तर हा येता जाता माझ्या खळीवर काहीतरी कमेंट करतो.' यावर इशा डे विचारते, 'ए काल काय म्हणाला होता गं?' तेव्हा प्रियदर्शिनी ओंकारला विचारते, 'काल काय म्हणाला होतास', तर ओंकार म्हणतो, 'प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात मी डुबकी मारु का?' ओंकारच्या या कमेंटवर एकच हशा पिकतो.
हास्यजत्रेची कलाकार वनिता खरातच्या लग्नात प्रियदर्शिनी आणि ओंकार राऊतचा एक हटके पोजमधील फोटो व्हायरल झाला होता. फोटोत प्रियदर्शिनीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती, नाकात नथ घातली होती, गालावर खळी आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य होतं. तर ओंकारने काळ्या रंगाचा सूट घातला होता. दोघंही एकमेकांच्या मिठीत उभे असतात आणि ओंकार तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. हा फोटो तुफान व्हायरल झाला आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. मात्र दोघांनीही आम्ही फक्त चांगले मित्र आहोत म्हणत चर्चेवर पूर्णविराम दिला. मात्र आता ओंकारने स्किटमध्येच का होईना हास्यजत्रेच्या स्टेजवरच प्रियदर्शिनी सोबत फ्लर्ट केलं आहे. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
प्रियदर्शिनीचा नुकताच 'फुलराणी' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि तिने त्याचं सोनंही केलं. सर्वच कलाकारांनी प्रियदर्शिनीचं कौतुक केलं. दरम्यान ओंकारने सोशल मीडियावर प्रियदर्शिनीसाठी खास पोस्ट लिहिली. याखाली त्याने नो कॉन्ट्रोव्हर्सी प्लीज असं हॅशटॅग दिलं. प्रियदर्शिनीनेही त्याचे आभार मानत शेवटचा हॅशटॅग महत्वाचा असं नमूद केलं होतं. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा थांबल्या होत्या.