'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर छोटे हास्यवीर उडवणार विनोदाचे तुफानी बार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 07:20 PM2022-11-12T19:20:23+5:302022-11-12T19:20:48+5:30
Maharashtrachi Hasyajatra : आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात वेगळेपण येणार आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून जगभरात प्रसिद्ध आहे. प्रेक्षक या कार्यक्रमाकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहत असतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते.
आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात वेगळेपण येणार आहे. मध्यंतरी सोनी मराठी वाहिनीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीर' स्पर्धा! आयोजित केली होती. त्यामध्ये १४ वर्षांखालील मुलांनी विनोदी सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवून या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. यामध्ये अनेक मुलांनी सहभाग घेतला आणि त्यांतल्या सर्वोत्तम स्पर्धकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मंचावर आमंत्रित केले गेले आहे.
१४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त हे छोटे हास्यवीर आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात हजेरी लावताना दिसतील. हे हास्यवीर कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि मंचावरही धमाल करताना दिसणार आहेत. आपल्या आवडत्या हास्यवीरांसोबत मंचावर हे छोटे हास्यवीर कशाप्रकारे मजा करतायत आणि या छोट्या हास्यवीरांनी केलेली धमाल प्रेक्षकांना बालदिनानिमित्त पाहायला मिळणार आहे!!
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी असे निरनिराळे सरप्रायझेस आपल्या प्रेक्षकांसाठी हास्याचा मंचावर आणते. यापुढे देखील असे काही सरप्रायझेस पुढे देखील पाहायला मिळतील. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीर', १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.