ओंकार भोजनेची क्रश कोण? म्हणाला, "त्या भानगडीत पडत नाही पण 'ति'चा स्वभाव..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 09:21 AM2023-04-23T09:21:36+5:302023-04-23T09:23:02+5:30
ओंकार नुकतंच एका मुलाखतीत प्रेम, लग्न या विषयी बोलला आहे. तो एका मुलीचा मोठा चाहता आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला कलाकार ओंकार भोजनेचे (Onkar Bhojane) लाखो चाहते आहेत. विनोदाचे अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना कसं खिळवून ठेवायचं हे त्याला परफेक्ट जमतं. दरम्यान ओंकार हास्यजत्रा सोडून चित्रपटाच्या वाटेवर गेला तेव्हा चाहते निराश झाले. त्याचा 'सरला एक कोटी' हा पहिला मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. तर सध्या तो भाऊ कदम सोबत 'करुन आलो गांव' या नाटकात काम करत आहे. ओंकार नुकतंच एका मुलाखतीत प्रेम, लग्न या विषयी बोलला आहे.
ओंकारच्या आयुष्यात कोणी आहे, लग्नाबद्दल काय विचार आहे या प्रश्नांवर उत्तर देताना ओंकार म्हणाला,'मी आधीपासूनच प्रेम वगैरेच्या भानगडीत पडत नाही. मी कधी प्रेमात पडलोही नाही. प्रेम असं ठरवून होत नसतं. माझ्या लग्नाची जबाबदारी मी आईवडील आणि मित्रांवर सोपवली आहे. त्यामुळे मी तो विचारच करत नाही.'
ओंकार पुढे म्हणाला,'माझी क्रश अशी कोणीही नाही पण मला कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच युट्यूबर अंकिता वालावलकरचा (Ankita Walawalkar) स्वभाव खूप आवडतो. सामाजिक विषयांवर बोलणं, गरजेचं आहे ते मुद्दे उचलून धरणं हे मला आवडतं आणि म्हणून मी तिला फॉलो करतो. मात्र हा मी फक्त तिचा फॅन आहे बाकी काही नाही.'
अंकिता वालावलकर ही मूळची मालवणची असून ती प्रसिद्ध यूट्यूबर आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने तिचं चॅनल आहे. कोकणी लोकांना, मालवणी भाषेला प्रोत्साहन देण्याचा ती चॅनल मधून प्रयत्न करते. मालवणी भाषा टिकूव राहावी, दूरवर पोहोचावी हा तिचा प्रयत्न असतो. सध्या ती तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.