"...तर पाप होईल", मराठी नाटकात काम न करण्यावर परेश रावल यांचं आश्चर्यकारक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:01 PM2023-06-11T12:01:55+5:302023-06-11T12:02:44+5:30
परेश रावल हे बॉलिवूडमधील अतिशय प्रभावशाली अभिनेते.
'हेरा फेरी' तील बाबूराव या पात्रामुळे सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी नुकतीच 'कोण होणार करोडपती' या मराठी कार्यक्रमात हजेरी लावली. मराठी दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत परेश रावल यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी परेश रावल मराठी भाषा, नाटक, कलाकार यांच्याविषयी भरभरुन बोलले. पण मराठी नाटकात काम करण्याची संधी असून सुद्धा ते का नाकारलं यावर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
परेश रावल हे बॉलिवूडमधील अतिशय प्रभावशाली अभिनेते. मात्र त्यांचं मराठीशी खास नातं आहे. त्यांनी अनेक मराठी नाटकांचे प्रयोग पाहिले आहेत असं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. ते म्हणाले, " तेव्हा नवीन भाई ठक्करच्या रसिक नाट्य संस्था इथेच सगळ्यात जास्त नाटकाचे प्रयोग व्हायचे. अमोल पालेकर यांच्याही नाटकाचा प्रयोग झाला होता. मी भाग्यवान आहे की मी अनेक मराठी नाटकं पाहिली. आज अभिनयाच्याबाबतीत सगळे बारकावे मी मराठी नाटक पाहूनच शिकलो. कारण त्यात एक सहजपणा असतो काहीही खोटं नसतं. मराठी कलाकार फार संयमी अभिनय करतात. मी हे सगळं जवळून पाहिलं."
मराठी नाटकात आजपर्यंत काम का केलं नाही यावर ते म्हणाले, "मला मराठी भाषेचा तितका सराव नाही. मी काही चुकीचं बोललो तर ते पाप होईल असं मला वाटतं. जर मी प्रॅक्टीस केली तर नक्कीच मराठी नाटकात काम करु शकतो. पण चुकीचं बोलायला नको म्हणून मी अजूनतरी मराठीत काम करण्यापासून लांब राहिलो."
परेश रावल यांचं हे उत्तर ऐकून त्यांच्या मनात मराठीबाबत किती आदर आहे हे लक्षात येतं. परेश रावल पुन्हा बाबूराव बनून प्रेक्षकांना हसवायला येणार आहेत. त्यांचा 'हेरा फेरी 3' लवकरच प्रदर्शित होणार आहे.