'पिंकीचा विजय असो'मधील पिंकीचा आहे सगळीकडे बोलबाला; ही अभिनेत्री आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 07:00 AM2022-01-04T07:00:00+5:302022-01-04T07:00:00+5:30
'पिंकीचा विजय असो' ही नवी कोरी मालिका लवकरच येणार आहे भेटीला
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे पिंकीचा विजय असो (Pinkicha Vijay Aso). १७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता ही नवीन मालिका भेटीला येणार आहे. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) पिंकीची भूमिका साकारते आहे.
शरयू सोनावणे उत्तम नृत्यांगणा असून ती पिंकीचा विजय असो या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. तिला नृत्याची आवड आहे. तिने भरत नाट्यमचे धडे गिरवले आहेत. डान्सच्या निमित्ताने तिचे महाराष्ट्रभर दौरे सुरु असतात. ती ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत यशोदा-कृष्ण बॅले करायची ज्यात तिने नृत्यामधून कृष्ण साकारला आहे. याबद्दल ती सांगते की हा अनुभव थक्क करणारा आहे. माझी ही नृत्याची आवड मला पिंकी हे पात्र साकारताना देखील उपयोगी पडते आहे. डान्सचे अनेक सीक्वेन्स आम्ही मालिकेत शूट केले आहेत जे प्रेक्षकांना पहाताना नक्कीच मजा येईल.
या मालिकेबद्दल शरयू सांगते की, आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवते. दुसऱ्याकडून काम करुन घेण्याचे अजब कसब पिंकीकडे आहे. तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.
पिंकी आणि शरयूमध्ये अजिबात साम्य नाही. पिंकी बिनधास्त आहे. तिची अखंड बडबड सुरु असते. पिंकीच्या स्वभावाच्या पूर्ण विरोधी असा माझा स्वभाव आहे. मी खूपच शांत आहे. त्यामुळे पिंकी साकारणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे. पिंकीची बोलण्याची स्टाईल माझ्या इतकी अंगवळणी पडली आहे की शूटिंग व्यतिरिक्तही मी इतरांशी संवाद साधताना त्याच भाषेत बोलते, असे शरयू सांगत होती.