‘पिंकीचा विजय असो’मधील ही चिमुकली आहे सोशल मीडिया स्टार, हटके आहे तिचा स्वॅग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:16 PM2022-02-07T16:16:55+5:302022-02-07T16:22:30+5:30
Pinky Cha Vijay Aso : अनेक मराठी मालिकांमधील बालकलाकार सध्या चर्चेत आहेत. मालिकेतील मुख्य कलाकारांइतकीच या बच्चेकंपनीचीही क्रेझ आहे. ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत ओवीची नटखट भूमिका साकारणारी चिमुकली सुद्धा यापैकीच एक.
सोशल मीडियावरचे अनेक चेहरे आज टीव्हीवर झळकत आहेत. काही जणांना मोठ्या पडद्यावरही संधी मिळाली आहे. अगदी यात बालकलाकारांचाही समावेश आहे. अनेक मराठी मालिकांमधील बालकलाकार सध्या चर्चेत आहेत. अगदी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेतली लाडकी परी असो किंवा ‘देवमाणूस’मधील मायरा असो सगळ्यांनीच नुसती धूम केली आहे. मालिकेतील मुख्य कलाकारांइतकीच या बच्चेकंपनीचीही क्रेझ आहे.
यापैकी ‘देवमाणूस’मधील मायरा अर्थात हे पात्र साकारणारी बालकलाकार मिमी खडसे सोशल मीडिया स्टार आहे. मिमिचे 87 हजारांवर अधिक फॉलोअर्स आहेत. ‘ रंग माझा वेगळा’ या मालिकेतील साईशा भोईर ही बालकलाकार देखील सोशल मीडिया स्टार आहे. आता अशीच आणखी एक सोशल मीडिया स्टारही एका मालिकेमुळे चर्चेत आली आहे.
होय, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ (Pinky Cha Vijay Aso) या नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेत ती ओवीची भूमिका साकारताना दिसत आहे. ओवीची नटखट भूमिका साकारणाऱ्या या चिमुकलीचं नाव साईशा साळवी (Saisha Salvi)आहे.
विश्वास बसणार नाही पण ही चिमुकली साईशा ही चाईल्ड मॉडेल आहे. सोशल मीडियावर तिचं स्वत:चं अकाऊंट आहे. इन्स्टावरचे तिचे रिल सतत चर्चेत असतात. अनेक ब्रँडसाठी ती जाहिराती करताना, मॉडेलिंग करताना दिसते.
साईशा चे आई वडील श्वेता साळवी आणि हेमंत साळवी हे पुण्यात वास्तव्यास आहेत. या दाम्पत्यास दोन मुली आहेत. साईशा ही त्यांची थोरली लेक आहे. ती अवघ्या चार वर्षांची आहे. साईशाचे वडील हेमंत साळवी हे हॉटेल व्यावसायिक आहेत.
लहान मुलांच्या कपड्यांच्या विविध ब्रॅण्डसाठी साईशाने काम केले आहे. अनेक मंचावर तिने रॅम्पवॉक करत उपस्थितांची मने जिंकली आहेत. हेन्को केअर, पी एन जी ज्वेलर्स अशा विविध व्यावसायिक जाहिरातीतून साईशा टीव्ही क्षेत्रात झळकली आहे. टाइम्स फॅशन विक, बॉलिवूड फॅशन विक यासारख्या मोठ्या मंचावर ही चिमुरडी गेल्या काही वर्षांपासून रॅम्पवॉक करताना दिसते. तिची हीच लोकप्रियता व प्रसिद्धी बघता तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ‘पिंकीचा विजय असो’ या कोठारे व्हिजन प्रस्तुत मालिकेत ती ओवीची भूमिका साकारते आहे.