"कलाकार मनातून दु:खी असतात..." प्राजक्ता माळीने रविशंकर यांना विचारला प्रश्न; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 12:56 PM2024-01-26T12:56:00+5:302024-01-26T12:57:09+5:30
'कलाकार इतरांच्या जीवनात आनंद आणतात, पण खाजगी जीवनात ते दु:खी असतात, एकटे असतात.' प्राजक्ताचा व्हिडिओ व्हायरल
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहेत. तसंच ती खूप आध्यात्मिकही आहे हे बरेच वेळा दिसलं आहे. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravishankar)यांना ती फॉलो करते. प्राजक्ताने त्यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्सही केला आहे. सध्या प्राजक्ता रविशंकर यांच्या बंगळुरु येथील आश्रमात गेली आहे. विशेषत: कला क्षेत्रातील लोकांसाठी झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये प्राजक्तानेही रविशंकर यांना एक प्रश्न विचारला ज्याची खूप चर्चा आहे. रविशंकर यांनी दिलेलं उत्तर ऐकून खूश झाल्याचंही प्राजक्ता म्हणते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडिओत प्राजक्ता विचारते, 'गुरुदेव, असं म्हणतात कलाकार इतरांच्या जीवनात आनंद आणतात, पण खाजगी जीवनात ते दु:खी असतात, एकटे असतात. आर्थिक, भावनिक, नात्यातील तणाव या गोष्टी असतात. तर कलाकराचा त्यांच्या कुटुंबाप्रती, मित्रपरिवाराप्रती, समाजाप्रती नक्की काय भाव असला पाहिजे? यावर श्री श्री रविशंकर उत्तर देतात की,'कलाकारांना त्यांच्या चेहऱ्यावर खोटं हसू आणावं लागतं. लोकांना खूश करण्याच्या नादात तुम्ही स्वत:लाच विसरता. स्वत:मध्ये झोकून बघा. कलाकारांचा स्वभाव भावूक असतो. म्हणून योग अत्यंत महत्वाचे आहे. याचा उद्देश केवळ कसरत करणं नाही तर दु:खाचा सामना करणं हाही आहे.'
प्राजक्ताला या प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये एक कलाकार म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. गुरुदेवने दिलेलं उत्तर ऐकून आपण खूप आनंदी झाल्याचंही प्राजक्ता यावेळी म्हणाली. प्राजक्ताला रविशंकर यांना प्रश्न विचारण्याची संधी याआधीही मिळाली होती. 'तिने लग्न करणं गरजेचं आहे का?' असा प्रश्न विचारला होता तेव्हा तो खूप व्हायरल झाला होता. आताही प्राजक्ता पुन्हा एकदा बंगळुरूत गेली आहे.