Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे का ?' प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांची मिश्कील प्रतिक्रिया; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:34 PM2023-02-22T12:34:29+5:302023-02-22T12:36:38+5:30
प्रवचनादरम्यान प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला यावर त्यांनी दिलेलं उत्तरही इंटरेस्टिंग आहे.
Prajakta Mali : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी जितकी बोल्ड आणि बिंधास्त म्हणून ओळखली जाते तितकीच ती खऱ्या आयुष्यात धार्मिकही आहे. प्राजक्ता आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravishankar) यांना फॉलो करते. नुकतेच तिने त्यांच्या बंगळुरु येथील आश्रमाला भेट दिली. तिथे ती श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनातही सहभागी झाली. प्राजक्ताने आश्रमातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. प्रवचनादरम्यान प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला यावर त्यांनी दिलेलं उत्तरही इंटरेस्टिंग आहे.
लग्न करणं गरजेचं आहे का ?
श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनात सहभागी झालेल्या प्राजक्ता माळीने सर्वांसमोरच गुरुंना प्रश्न विचारला की, 'लग्न करणं सगळ्यांना अनिवार्य आहे का?' प्राजक्ताचा हा प्रश्न ऐकून रविशंकर मिश्कीलपणे म्हणतात,'तुम्ही हे मला विचारत आहात? असं असतं तर कधीच माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची असती.'रविशंकर यांची प्रतिक्रिया येताच प्राजक्तासह सर्वच उपस्थितांना हसू येते.
ते पुढे म्हणतात, 'असं काही अनिवार्य नाही. बघा आनंदी राहायला शिका. तुम्ही लग्न करुनही आनंदी राहू शकता आणि लग्न न करताही खूश राहू शकता.काही लोक लग्न करुन आणि लग्न न करताही दु:खी असतात. याची निवड तुम्हीच करायची आहे तुम्हाला काय आवडतं ते करा. फक्त आनंदी राहा.'
प्रवचनात सहभागी असलेल्या अक्षय सुलताने याने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. प्राजक्तानेही तो तिच्या अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केली आहे. सध्या प्राजक्ताचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. सर्वांच्या हृदयाची धडकन असलेल्या प्राजक्ता माळीला नेहमीच 'लग्न कधी करणार?' असा प्रश्न विचारला जातो. मात्र प्राजक्ताने अनेकदा हा प्रश्न टाळलाच आहे. प्राजक्ता पुन्हा मुंबईत परतली असून तिने कामाला सुरुवात केली आहे.
प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सूत्रसंचालन करत आहे. तिचे सूत्रसंचालन, तिचे वेगवेगळे लुक्स नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. याशिवाय तिने प्लॅनेट मराठीवरील रानबाजार मध्ये साकारलेल्या बोल्ड भूमिकेतून सर्वांचेच लक्ष वेधले. तसेच प्राजक्ताने स्वत:ता 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रॅंडही सुरु केला आहे. यातून तिने मराठी दागिन्यांना प्राधान्य दिले आहे.