Prajakta Mali : प्राजक्ता माळीची नवी इनिंग! अभिनयासह करणार हा साईड बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 12:58 PM2023-01-07T12:58:46+5:302023-01-07T13:08:38+5:30

Prajakta Mali : आता प्राजक्ता माळीने एका नवीन पर्वाला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी तिचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

Prajakta Mali: New innings of Prajakta Mali! This side business will be done along with acting | Prajakta Mali : प्राजक्ता माळीची नवी इनिंग! अभिनयासह करणार हा साईड बिझनेस

Prajakta Mali : प्राजक्ता माळीची नवी इनिंग! अभिनयासह करणार हा साईड बिझनेस

googlenewsNext

आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. 'प्राजक्तप्रभा' या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात करत असून 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे; महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कला- इतिहासप्रेमी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाकादंबरीकार, इतिहास प्रेमी व अभ्यासक विश्वास पाटील उपस्थित होते. 

महाराष्ट्राच्या विविध भागातील आभूषणे 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून तीने जगभरातील आभूषणप्रेमींसाठी आणली आहेत. या वेळी प्राजक्ताला तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देत राज ठाकरे म्हणाले, प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ हा स्वतःचा जो ब्रँड उभा केला आहे, त्यासाठी तीचे अभिनंदन. तिने जे दागिने दाखवले त्यांची माहिती मलाही नव्हती. तिची या संकल्पनेमागची भावना, हेतू खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला आपल्याच काही गोष्टींचा इतिहास माहीत नसतो. प्राजक्ताप्रमाणेच पुढील पिढीही आपला पारंपरिक, मौल्यवान ठेवा, दागिने त्यांच्या पुढील पिढीला सांगण्यासाठी जोपासतील.


प्राजक्ताचे कौतुक करताना महाकादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले, कोणतीही कृती करण्यासाठीचे मूळ हे रक्तातच असावे लागते. प्राजक्ता ही महाराष्ट्रातील मुलगी आहे. त्यामुळे मराठी परंपरा जपण्याचे मूळ हे तिच्या रक्तातच आहे. तिने उचललेले हे पाऊल स्तुत्य आहे. तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ‘प्राजक्तराज’ पोहोचावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. 


प्राजक्ता माळी म्हणते, दागिन्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड काढेन, हा विचारही कधी मनात नव्हता. भावाच्या लग्नादरम्यान दागिन्यांबाबत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक जाणवले ते म्हणजे आपले पारंपरिक दागिने लोप पावत आहेत. ध्यानीमनी नसतानाही हा नवीन प्रवास सुरू झाला आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अनेक तज्ज्ञांची, जाणकारांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा अस्सलपणा जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. 


प्राजक्तराज या ब्रॅण्डच्या नावाबद्दल प्राजक्ता म्हणाली की, हे नावही अतिशय समर्पक आहे. राजेशाही थाटाचा हा नजराणाच आहे. 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील अस्सल पारंपरिक दागिने मिळतील. या दागिन्यांवर आधुनिकतेचा साज नसेल आणि हीच 'प्राजक्तराज'ची खासियत असेल. आज माननीय राज ठाकरे व विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत 'प्राजक्तराज'चा लोकार्पण सोहळा होत आहे. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. सध्या ही आभूषणे वेबसाईटवर उपलब्ध असली तरी लवकरच काही प्रदर्शनांमध्येही हे अलंकार विक्रीसाठी उपलब्ध होतील. जेणे करून महाराष्ट्राची संस्कृती कानाकोपऱ्यात पोहोचेल. लवकरच आम्ही पुरुषांसाठीही अलंकार घेऊन येऊ. याशिवाय अनेक कल्पना आहेत, ज्या हळूहळू आपल्या समोर येतीलच. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या अभिनयावर, नृत्यावर, कवितासंग्रहावर प्रेम केले, तसेच प्रेम, प्रतिसाद तुम्ही 'प्राजक्तराज'वरही कराल, अशी अपेक्षा बाळगते.

Web Title: Prajakta Mali: New innings of Prajakta Mali! This side business will be done along with acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.