"तुम्ही स्वत: एक महिला असून...", प्राजक्ता माळीने करुणा मुंडेंना सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 18:52 IST2024-12-28T18:51:22+5:302024-12-28T18:52:03+5:30
सुरेश धस यांना उत्तर देताना प्राजक्ताने करूणा मुंडे यांनाही सुनावलं आहे. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी व्हिडिओमध्ये प्राजक्ताचं नाव घेतलं होतं. प्राजक्ताने पत्रकार परिषदेतून त्यांना प्रश्न विचारला आहे.

"तुम्ही स्वत: एक महिला असून...", प्राजक्ता माळीने करुणा मुंडेंना सुनावले खडेबोल
भाजपा आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे,” असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. प्राजक्ता माळीबाबत असं वक्तव्य करणं त्यांना महागात पडणार आहे. सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली. अभिनेत्रीने त्यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. शिवाय कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही तिने म्हटलं आहे.
सुरेश धस यांना उत्तर देताना प्राजक्ताने करूणा मुंडे यांनाही सुनावलं आहे. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी व्हिडिओमध्ये प्राजक्ताचं नाव घेतलं होतं. प्राजक्ताने पत्रकार परिषदेतून त्यांना प्रश्न विचारला आहे. "करुणाताईंना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वत: एक महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलफेक करत राहिल्या तर कसं होणार? मी सांगू इच्छिते की तुम्हाला माझ्याबद्दल मिळालेली माहिती अत्यंत चुकीची आहे. यापुढे कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही. महिल्यांच्या बाबतीत तुम्ही संवेदशनशीलपणे बोलाल, अशी आशा आहे", असं प्राजक्ताने म्हटलं आहे. करुणा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याप्रकरणीही प्राजक्ताने त्यांना नोटीस पाठवल्याचं म्हटलं आहे.
सुरेश धस यांनी माझी माफी मागावी!
मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा. हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन. मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते. माझी आई झोपलेली नाही. माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केलेत. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही. मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करते की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी.