"माझ्या बायकोचा पायगुण कमाल आहे...", 'पारू'बद्दल सांगताना प्रसादने अमृताबद्दल व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:56 AM2024-02-20T11:56:35+5:302024-02-20T11:57:03+5:30
Prasad Jawade : अभिनेता प्रसाद जवादे 'पारू' ह्या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण करत आहे. या मालिकेत तो आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारत आहे.
अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade) 'पारू' (Paru Serial) ह्या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण करत आहे. या मालिकेत तो आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारत आहे. प्रसादने त्याच्या या नवीन मालिकेबद्दल आणि आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. प्रसादने सांगितले की, मी तर हेच सांगेन की माझ्या बायकोचा पायगुण कमाल आहे. वर्षाची सुरुवातच कामाने झाली. या मालिकेचं शूट साताऱ्यात होतंय आणि लग्न झाल्यावर पहिल्यांदाच इतक्या दूर शूट करतोय. पण अमृताची साथ आहे तर हा नवीन प्रवास नक्कीच यशस्वी होणार यात मला शंकाच नाही.
पारु मालिकेबद्दल प्रसाद म्हणाला की, आदित्य किर्लोस्करच्या भूमिकेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. माझा मित्र-परिवार तर हेलिकॉप्टरच्या माझ्या एन्ट्री शॉटवर एकदम फिदा आहे. एक श्रीमंत घराण्याचा मुलगा पण आपल्या आईच्या शब्दाबाहेर नसणारा अशी व्यक्तीरेखा आहे. माझी आई आणि अमृताची आई दोघी अतिशय खुश आहेत की मी पुन्हा झी मराठीवर दिसणार आहे. माझ्यासाठी झी मराठीवर काम करणे म्हणजे घरी परतण्यासारखे आहे.
प्रसाद आणि आदित्य दोघांचं आईवर आहे प्रचंड प्रेम
तो पुढे म्हणाला की, आदित्य एक श्रीमंत घरातला मुलगा आहे तर त्याचा लुक जबरदस्तच असला पाहिजे. मी काही महिन्यापासून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरवात केली आणि प्रोमो आणि शो मध्ये ती मेहनत दिसून येत आहे म्हणून मी संतुष्ट आहे. आदित्य किर्लोस्करच्या खूप शेड्स आहेत जसा-जसा शो पुढे जाईल तुम्हाला कळेलच. प्रसाद आणि आदित्य मध्ये काही साम्य गोष्टीही आहेत. त्या दोघांमध्ये सगळ्यात मोठं साम्य म्हणजे आईवर प्रचंड प्रेम करतात. आदित्यला महागड्या आणि स्टयलिश गाड्यांचा खूप शोक आहे आणि प्रसादला ही स्पोर्ट्स कार खूप आवडतात. प्रेक्षकांना हेच सांगेन की आतापर्यंत जितकं प्रेम देत आलात त्याहुन जास्त प्रेम ह्या भूमिकेला आणि 'पारू' ला द्या.