'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 01:03 PM2022-07-22T13:03:48+5:302022-07-22T13:05:13+5:30
Kon Honaar Crorepati : पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या संस्थेला मदत करण्यासाठी प्रसाद ओक आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या उपस्थित राहणार असून त्यांच्या 'कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था, अकोले' या संस्थेला मदत म्हणून अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील लाडका कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यातील हास्यवीर गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट हेही उपस्थित राहणार आहेत.
'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. आत्तापर्यंत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात राहीबाई पोपेरे यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्याबरोबर हास्यवीर असल्याने हा भाग निश्चितच रंगतदार होणार आहे. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. बियाणांच्या बॅंकेची सुरुवात नेमकी कशी झाली इथपासून पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी त्या अनवाणी गेल्या इथपर्यंतचा सगळा प्रवास राहीबाईंनी या भागात सांगितला आहे. तर प्रसाद ओकने चित्रपटाच्या यशाची गंमत तसेच पूर्वीचे संघर्षमय दिवस अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. स्त्री कलाकारांनी कायम धाडसी भूमिका स्वीकारल्या पाहिजेत असे मत प्राजक्ता माळी हिने 'कोण होणार करोडपती'च्या भागात व्यक्त केले.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या प्रसिद्ध कार्यक्रमातल्या हास्यवीरांनी पडद्यामागचे अनेक किस्से 'कोण होणार करोडपती'च्या या विशेष भागात उलगडले. गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट या सगळ्यांचा प्रवास आणि विशेष गुण यांची माहिती या भागात सांगण्यात आली. एरवी खळखळून हसवणारा ओंकार किती शांत आणि सामाजिक कार्याची आवड जपणारा आहे, रसिकाची मालवणी भाषेची आवड, कुठल्या स्कीटनंतर प्रसाद किस्सा सांगतो अशी अनेक गुपितं या विशेष भागात उलगडली गेली आहेत. त्याचबरोबर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोनी मराठीवर पुन्हा कधीपासून सुरू होणार, याबद्दलची माहितीही या विशेष भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.