होणाऱ्या सासूच्या वाढदिवसाला प्रथमेश लघाटेची पोस्ट, 'या' नावाने मारतो हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:00 PM2023-07-07T14:00:56+5:302023-07-07T14:02:33+5:30
मुग्धाच्या आईचा आज वाढदिवस असल्याने होणाऱ्या जावयानेही खास फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate)यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर चर्चांना उधाणच आलं. सोशल मीडियावर सध्या या दोघांचीच चर्चा आहे. आपल्या घरातलंच लग्नकार्य असल्यासारखे सगळे खुश झालेत. प्रथमेश आणि मुग्धा काही महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचंही कुटुंब एकमेकांना फार जवळून ओळखतं. मुग्धाच्या आईचा आज वाढदिवस असल्याने होणाऱ्या जावयानेही खास फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रथमेश आणि मुग्धा सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पंचरत्नांमधील दोन रत्न. बघता बघता ही मुलं इतकी मोठी झाली की त्यांच्यातील दोघं प्रेमात पडतील अशी कल्पनाही कोणी केली नसेल. ५ वर्षांची छोटी मुग्धा जी प्रथमेशला दादा म्हणायची तोच आता तिचा 'अहो' होणार आहे. मुग्धाची आई भाग्यश्री यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने प्रथमेशने इन्स्टाग्रामवर होणाऱ्या सासूसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याने फोटोवर कॅप्शन देत लिहिले,'वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी'.
प्रथमेशने मुग्धाच्या आईसोबतचा अतिशय गोड फोटो शेअर केलाय. दोघांच्याही कुटुंबांनी एकत्र येत जोगळेकर कॉटेज येथे मुग्धाच्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचेही फोटो मुग्धा आणि प्रथमेशने शेअर केलेत. प्रेमाची कबुली दिल्यानंतर या क्युट कपलने एकत्र येत चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. सध्या सगळीकडूनच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.