कौन बनेगा करोडपतीचा आगामी भाग या कारणामुळे असणार खास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 01:32 PM2018-10-03T13:32:04+5:302018-10-03T13:33:30+5:30
एका शेतकरी कुटुंबातून येऊन नौसेनेत दाखल झालेल्या प्रवीण टीओटीया या वीराने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पराक्रम गाजवला आहे. ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जिंकलेले पैसे जगभरातील आयर्न मॅन आणि अल्ट्रा मेन यांना देणार आहेत.
कौन बनेगा करोडपती 10 च्या आगामी भागात लवकरच प्रेक्षकांना प्रवीण टीओटीया यांना पाहायला मिळणार आहे. एका शेतकरी कुटुंबातून येऊन नौसेनेत दाखल झालेल्या या वीराने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पराक्रम गाजवला आहे. ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जिंकलेले पैसे जगभरातील आयर्न मॅन आणि अल्ट्रा मेन यांना देणार आहेत. तसेच ते 2020 मध्ये जगातील सर्वात श्रेष्ठ मॅरथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. यातील काही पैसे ते यासाठी वापरणार आहेत आणि उर्वरित रक्कम ते त्यांच्या गावातील मुलांसाठी वाचनालय बनवण्यासाठी खर्च करणार आहेत.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घेण्याविषयी प्रवीण टीओटीया सांगतात, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात हॉट सीटवरून बसून मला किती आनंद झाला हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अमिताभ बच्चन यांचे अस्तित्व आणि व्यक्तिमत्व अद्भुत आहे. लोकांच्या ज्ञानात भर घालणारा हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल मी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा आभारी आहे.
प्रवीण टीओटीया यांनी आजवर अनेक अडणींवर मात केली आहे. त्यांनी आजवर केलेल्या संघर्षातून प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यांच्या कब तक रोकोगे क्षणाविषयी ते सांगतात, मला आयर्न मॅन बनायचे होते. त्यावेळीची एक घटना मी सांगू इच्छितो. आम्ही सायकलने 110 किमी चढ चढत होतो. जेव्हा 70 किमी चढणे बाकी होते, तेव्हा डी-रेलर तुटले. त्यावेळी माझा पाय मुरगळला आणि ढोपरे खरचटले. पण या अडथळ्यांमुळे माझा प्रवास थांबला नाही. तुमच्या आयुष्यात नेहमी असे एक कारण असले पाहिजे जे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील. आपण जर इथवर आलो आहोत, तर जीवनात आणखी पुढे देखील जाऊ शकतो. मला हेच वाटते की, माझे कर्म हाच माझा धर्म आहे. या भावनेमुळे तुम्ही भ्रष्टाचार किंवा कोणतेही दुष्कृत्य करण्यास धजावणार नाही. जर तुम्हाला तुमच्या देशाची प्रगती हवी असेल, तर जीवनात ‘सबबी; सांगू नका आणि पुढे जाण्याचा ‘प्रयत्न’ करा.