"ही मुक्ता नको, तेजश्रीला परत आणा", 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा नवा प्रोमो पाहून चाहत्यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:10 IST2025-01-15T11:08:10+5:302025-01-15T11:10:13+5:30
'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. पण, हा प्रोमो पाहून मात्र चाहते नाराज झाले आहेत.

"ही मुक्ता नको, तेजश्रीला परत आणा", 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा नवा प्रोमो पाहून चाहत्यांचा संताप
'प्रेमाची गोष्ट' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अभिनेता राज हंचनाळे सागर कोळी आणि तेजश्री प्रधान मुक्ताच्या भूमिकेत होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने मालिकेतून एक्झिट घेतली. तिच्या जागी मालिकेत आता नव्या मुक्ताची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताची भूमिका साकारणार आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये नवी मुक्ता प्रेक्षकांना दिसत आहे. "सागर कोळी यांना कधीच मुलगी नको होती. सईच्या जन्माआधी अबॉर्शनचा विचार केला होता" असं या प्रोमोमध्ये सांगण्यात येत आहे. त्यानंतर सई रस्त्यावर चालत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. "पप्पांना मी कधीच नको होते" असं ती म्हणत आहे. तेवढ्यात पाठीमागून गाडी येते आणि सई मुक्ताई असं ओरडते. तेवढ्यात मुक्ताची भूमिका साकारणारी स्वरदा ठिगळे सईला वाचवत असल्याचं दिसत आहे. पण, हा प्रोमो पाहून मात्र चाहते नाराज झाले आहेत.
नव्या मुक्ताला पाहून चाहते खूश दिसत नाहीत. मालिकेच्या या नव्या प्रोमोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. "आता मालिका बोअर होणार", "मुक्ता बदलली मालिकेचा सत्यानाश केला", "आम्हाला तिच मुक्ता हवी आहे नवीन नको प्लीज परत आणा त्या मुक्ताला प्लीज ", "आम्ही नाही बघणार आता मालिका", "आम्हाला नको आहे यार ही मुक्ता, तेजश्रीला परत आणा" अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लवकरच नव्या मुक्ताची एन्ट्री होणार आहे. १७ जानेवारीला स्वरदा ठिगळे 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता म्हणून एन्ट्री घेणार आहे. याआधीही स्वरदाने काही मालिकांमध्ये काम केलं आहे.