Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या स्पर्धकांना घराबाहेर आल्यावर भेटायचे आहे या खास व्यक्तींना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 10:00 PM2018-07-18T22:00:10+5:302018-07-19T08:25:05+5:30
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा आहे.
बिग बॉस या रिऍलिटी शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. अस्ताद काळे आणि पुष्कर जोगने या कार्यक्रमाच्या फायनल पर्यंत धडक मारली आहे. आता या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.
शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, पुष्कर जोग, मेधा घाडे, अस्ताद काळे आणि स्मिता गोंदकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना भरभरून उत्तरे दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ही सगळी मंडळी या घरात असल्याने त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नाहीये. त्यामुळे सगळ्या पत्रकारांना भेटून स्पर्धकांना खूप आनंद झाला होता. एवढया दिवसांनी इतके लोक पाहायला मिळाले, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या अशाच सगळ्या स्पर्धकांच्या प्रतिक्रिया होत्या.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा आहे. अस्ताद काळेच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असल्याचे त्याने या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी मान्य केले होते. त्याला या घरातून बाहेर पडल्यावर त्याच्या या खास मैत्रिणीला म्हणजेच अभिनेत्री स्वप्नाली पाटीलला भेटायचे आहे असे त्याने सांगितले. त्याचे आई वडील पुण्याला असल्याने फिनले नंतर तो पुण्याला जाणार आहे पण मी तिथे स्वप्नालीला बोलवून घेईन असे तो सांगतो तर स्मिताला तिच्या आईला भेटायचे आहे. मेघाला तिच्या कुटुंबियांना भेटायची ओढ लागली आहे तर शर्मिष्ठाला तिचे वडील आणि तिची लाडकी मैत्रीण मधुगंधा कुलकर्णी यांना भेटायचे आहे. पुष्करला मुलीला भेटायचे असून बायकोला आलिंगन द्यायचे आहे. सईला देखील पालकांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे.
बिग बॉस या कार्यक्रमात गेल्यापासून प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी मेहनत घेत आहे. या कार्यक्रमाचा अंतिम भाग आता काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या स्पर्धकांच्या फॅन्सनी अधिकाधिक मते देऊन आपल्याला विजेता बनवावे असे प्रत्येक स्पर्धकाला वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने पत्रकारांच्या माध्यमातून आजवर न मांडू शकलेल्या अनेक गोष्टी लोकांसमोर मांडल्या.