Priyadarshini Indalkar : मुंबईला आल्यावर 'या' अभिनेत्रीसोबत राहायची 'फुलराणी', म्हणाली,"तेच माझं पहिलं घर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 08:40 AM2023-05-07T08:40:19+5:302023-05-07T08:41:09+5:30
मुळच्या पुण्याच्या प्रियदर्शिनीने सुरुवातीला मुंबईत खूप स्ट्रगल केलं.
Priyadarshini Indalkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आता 'फुलराणी' म्हणून प्रसिद्ध झाली आहे. हास्यजत्रेमुळे तिचं नशीबच उजळलं आणि तिला थेट सुबोध भावेसोबत (Suobodh Bhave) मुख्य भूमिका असलेला सिनेमा करण्याची संधी मिळाली. तिने त्या संधीचं सोनंही केलं आणि फुलराणी म्हणून भाव खाऊन गेली. मुळच्या पुण्याच्या प्रियदर्शिनीने सुरुवातीला मुंबईत खूप स्ट्रगल केलं. सुरुवातीला ती मुंबईत कुठे राहायची याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला.
प्रियदर्शिनी म्हणाली,"सगळ्यात आधी मुंबईत आले तेव्हा मी 'आमच्या हिचं प्रकरण हे नाटक करत होते. तेव्हा भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule), नंदिता पाटकर सुद्धा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 106 प्रयोग आधीच झाले होते आणि मी रिप्लेसमेंट म्हणून त्यांच्यात सामील झाले. नाटकाचे प्रयोग जेव्हा सलग मुंबईत असायचे तेव्हा मी भार्गवी ताई किंवा नंदिता ताई कडे राहायचे. जास्त करून मी भार्गवी ताईकडे राहिली आहे त्यामुळे ते माझ्यासाठी मुंबईतील पहिलं घर. ती मला मुलींसारखंच जपायची ती नाटकातही माझी आई होती."
'फुलराणी'च्या प्रिमियरला भार्गवी चिरमुलेनेही हजेरी लावली होती. त्यावेळी प्रियदर्शिनीला खूप आनंद झाला होता. मुंबईत आल्यावर राहायला घर नसताना प्रियदर्शिनीला या दोन्ही अभिनेत्रींनी सहारा दिला होता. आज प्रियदर्शिनी अभिनेत्री आरती मोरेसोबत फ्लॅटमध्ये राहते असंही तिने सांगितलं होतं. प्रियाच्या यशाने त्यांनाही खूप आनंद झाला आहे.