अभिनेता विनोद गायकर लिखित ‘वेणूच्या गोष्टी’ पुस्तक प्रकाशित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 04:33 PM2022-05-23T16:33:33+5:302022-05-23T16:51:20+5:30
मुलांनी सुसंकृत व्हावं, त्यांना बालपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक विनोद गायकरने त्याची सुरुवात स्वत:पासून केली आहे.
अभिनेता विनोद गायकरने लिहिलेलं वेणूच्या गोष्टी पुस्काचं प्रकाशन झालं आहे. मुलांनी सुसंकृत व्हावं, त्यांना बालपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक विनोद गायकरने त्याची सुरुवात स्वत:पासून केली आहे. विनोदने आपली मुलगी वेणूसाठी तब्बल १०० गोष्टींचं एक पुस्तक लिहिलं आहे ‘वेणूच्या गोष्टी’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विनोदची आई लक्ष्मी गायकर, नाटककार देवेंद्र पेम, लेखक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या हस्ते नुकतंच झालं.
'लॉकडाऊनच्या काळात विनोद सतत काहीतरी लिहीत बसलेला असायचा. त्याला झोपणे, आराम तसेच खाण्याचं भान नसायचं. ते लिखाण नेमकं काय आहे, कसं आहे हे आज पुस्तक रूपाने छापून आलेय. ते पाहताना मला आनंद होतोय, असे उद्गार वेणूची आजी, विनोदाची आई लक्ष्मी गायकर यांनी काढले.
'तुम्ही वाचलं पाहिजे असं मला तरी कोणी सांगितले नाही. कळत-नकळत वाचनाची गोडी लागली. वेणू सारख्या कित्येक मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून विनोदने हे पुस्तक बालकथांचे पुस्तक लिहिलंय, ही कल्पनाच सुखावणारी आहे. ‘वेणूच्या गोष्टी’ गोष्टी हे पुस्तक फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही तितकेच उपयोगी ठरेल. लहानांचे बालविश्व समृद्ध करेलच. पण मोठ्यांच्याही त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळेल;' असे ज्येष्ठ नाटककार देवेंद्र पेम यावेळी म्हणाले.
काळासोबत पुढे जाताना वाचन संस्कृती जगावी, टेक्नोलॉजीच्या बरोबर धावताना हातात पुस्तक घेऊन वाचन करण्याचा आनंद वेणूला मिळावा म्हणून तिच्या आणि तिच्यासारख्या अनेकांच्या भावविश्वाशी जवळीक साधणारं 'वेणूच्या गोष्टी' हे पुस्तक आहे. ‘डीटेक्टीव्ह डकी’, ‘गणू’, ‘जेलु’ ही आणि अशी अनेक पात्र विनोदच्या लिखाणातून आकार घेतं गेली. या पुस्तकाबद्दल सोशल मीडियावर लिहिल्याबद्दल नेटकाऱ्यांना ही कल्पना आवडली. 'आम्हालाही आमच्या मुलांसाठी हे पुस्तक हवं आहे, अशी मागणी वाढू लागली. अखेर २५ गोष्टींच एक पुस्तक, असा १०० गोष्टी-चार पुस्तकांचा एक संच करतं हे पुस्तक अखेर विक्रीसाठी उपलब्ध झालं आहे. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. वेणू आणि विनोदने 'हलक्या कानाचा' या गोष्टीचे यावेळी वाचन केलं.