माझी साडी खेचली, छातीवर पंच मारला; केतकी चितळेकडून विनयभंगाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:00 PM2022-07-02T14:00:49+5:302022-07-02T14:02:59+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारी केतकी चितळे (Ketki Chitale) तब्बल ४१ दिवस जेलमध्ये होती, जामीन मिळाल्यानंतर आता तिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारी केतकी चितळे तब्बल ४१ दिवस जेलमध्ये होती, जामीन मिळाल्यानंतर केतकी चितळेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. १५ मे रोजी तिला अटक झाली होती आणि ३१ मे रोजी तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. २२ जून रोजी तिची जामिनावर सुटका झाली.
केतकी चितळे हिने जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ती म्हणाली की, 'एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करून फेसबुकवर शेअर केल्यानंतर इतका मोठा गुन्हा होतो का की तुम्ही थेट तुरुंगात टाकता, ४१ दिवस तुम्ही त्या व्यक्तीपासून काढून घेता? मी काही चुकीचं केलं नाही, हे मला माहित आहे. त्यामुळे मी या गोष्टीचा सामना करू शकले.
बेकायदेशीररित्या घरातून नेण्यात आले - केतकी चितळे
केतकी चितळे पुढे म्हणाली की, खरेतर मला बेकायदेशीररित्या घरातून नेण्यात आले. बेकायदेशिररित्या अरेस्ट वॉरंट आणि नोटिसशिवाय तुरुंगात टाकण्यात आले. मला अर्ध्या तासाचीही नोटीस दिली नाही, थेट पोलीस घरी आले आणि मला उचलून नेले. हा देखील गुन्हाच आहे.
माझा विनयभंग झाला.... - केतकी चितळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांकडून आणि जमावाकडून मारहाण झाल्याचा आरोपही केतकीने या मुलाखतीत केला. याबद्दल ती म्हणाली की, माझ्या कानाखाली मारण्यात आलं, डोक्यात कुणीतरी जोरात टपली मारली आणि राइट ब्रेस्टवर पंच मारला. मी साडी नेसली होते. कुणीतरी धक्का दिला, पायात पाय घातल्यामुळे मी पोलिसांच्या गाडीत पडले. साडी देखील खेचण्यात आली. माझा पदर पडला होता, साडी वर गेली होती, माझा विनयभंग झाला.... इतके होऊनही अंगावर केमिकल रंग आणि अंडीदेखील फेकण्यात आले.
माझ्यावर गुन्हेगाराचा लागला ठप्पा - केतकी चितळे
मला माझ्या आयुष्यातील ते ४१ दिवस परत मिळणार नाही. मी काम गमावले. प्रोजेक्ट्स हातातून गेले आहेत. मला माहितही नाही की मला नवीन प्रोजेक्ट्स मिळतील की नाही. कारण माझ्यावर गुन्हेगाराचा ठप्पा लागला आहे. मी सध्या जामिनावर बाहेर असून मला पुन्हा अटक होऊ शकते. माझ्यावर २१ केस दाखल आहेत, असे केतकीने सांगितले.