‘बाळूमामा’ मालिकेच्या सेटवर राडा; मारहाण, सेट निर्माता जखमी, कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 07:41 AM2022-04-08T07:41:03+5:302022-04-08T07:41:39+5:30
balumamachya navan changbhal Marathi serial : मराठी वाहिनीवरील मालिका ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ याच्या सेटवर सेट निर्मात्याला मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा पाय मोडण्यात आला आहे.
मुंबई - मराठी वाहिनीवरील मालिका ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ याच्या सेटवर सेट निर्मात्याला मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा पाय मोडण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीने लेखी तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस ठाणे आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे.
मारहाण करण्यात आलेल्या सेट निर्मात्याचे नाव अलंकार भावरे (४५) असे आहे. बाळूमामा मालिकेची शूटिंग गोरेगाव पूर्वच्या फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. भावरे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार, ते फिल्म सिटीत चित्रपट आणि मालिकांचे सेट बनवतात. ते ४ मार्च रोजी दुपारी १ वाजता अप्पू टप्पू मैदानावर गेले आणि त्यांनी बाळूमामाचा सेट तयार केला. दुपारी ते जेवायला बाहेर गेले तिथून परतल्यावर त्यांना सेटवर ड्रेसमॅन करण हा झोपलेला दिसला. त्यामुळे त्यांनी त्याला उठवत सेटवर झोपण्यास विरोध केला. त्यावरून त्यांच्यात हुज्जत सुरू झाली आणि हाणामारी झाली. त्यांचा आवाज ऐकून मालिकेचे दिग्दर्शक बाबासाहेब आणि सहायक दिग्दर्शक समीर हे देखील तेथे आले आणि त्यांनीही भावरेंवर हात उचलला. करणने लोखंडी सळीने त्यांच्या पायावर हल्ला केला. त्यामुळे त्यांचा उजवा पाय मोडल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भावरे यांनी याप्रकरणी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला तेव्हा आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी भावरे यांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सगळ्या प्रकाराबाबत लोकमतने आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांना फोन तसेच मेसेज करत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उत्तर दिले नाही.
पोलिसांनी घेतल्या कोऱ्या कागदावर सह्या
ज्या पोलिसांनी मला रुग्णालयात दाखल केले त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना अटक करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांची कोणतीही चौकशी अथवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या उलट त्यांनी माझ्याकडूनच तीन ते चार कोऱ्या कागदांवर सह्या करुन घेतल्या. त्यामुळे माझ्यावरील हल्लेखोर तसेच त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करत मला न्याय द्यावा, अशी माझी मागणी आहे. याबाबत मी आरेसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
- अलंकार भावरे,
तक्रारदार सेट निर्माते