‘राधाकृष्ण’ मालिकेत सांगितले जाणार होळीचे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:57 PM2019-03-18T18:57:28+5:302019-03-18T18:59:58+5:30
वृंदावनमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीचे महत्त्व आणि होळीच्या विविध प्रकारांची माहिती ‘राधाकृष्ण’ या मालिकेमध्ये देण्यात येणार असल्यने टीव्हीवर साजरी करण्यात येणारी ही सर्वात मोठी होळी असेल.
होळीचा उत्सव हा चांगल्याचा वाईटावरील विजय दर्शवितो आणि भक्ती, परंपरेसोबत विविध रंगांची उधळण करीत साजरा केला जातो. ‘स्टार भारत’वरील ‘राधाकृष्ण’ या भव्य मालिकेत हा सण साजरा केला जाणार असून या उत्सवात रंगांचा वापर का करतात, ते सांगितले जाणार आहे.
वृंदावनमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीचे महत्त्व आणि होळीच्या विविध प्रकारांची माहिती या भागांमध्ये देण्यात येणार असल्यने टीव्हीवर साजरी करण्यात येणारी ही सर्वात मोठी होळी असेल. या भागांमध्ये राधा आणि कृष्ण विविध प्रकारच्या होळ्या खेळताना दिसतील. त्यात ‘लाठमार होळी’चाही समावेश आहे. या प्रकारात गोपिका पुरुषांना लाठीने मारून पळवून लावतात. ‘फुलांच्या होळी’त पुजारी भक्तांवर फुलांच्या पाकळ्यांची बरसात करतात. तसेच ‘कीचड की होली’ आणि ‘रंग की होली’ या होळ्यांचाही यात समावेश असून त्यात अनुक्रमे चिखल आणि विविध रंगांचा वापर करून होळी खेळली जाते.
कृष्णाची भूमिका रंगविणारा अभिनेता सुमेध मुदगलकर याविषयी सांगतो, “होळीचा इतिहास आणि ती किती प्रकारे साजरी केली जाते, ते मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण कृष्णाच्या भूमिकेत होळी साजरी करण्याचा हा अनुभव माझ्या जीवनात एकदाच येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना होळीच्या सणाचं महत्त्व विशद करण्याची संधी मला मिळत असल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. होळीचे सर्व भाग चित्रीत करताना आम्हाला खूपच मजा आली. आता प्रेक्षकांनाही ते पाहताना तितकीच मजा येईल, अशी अपेक्षा आहे.”
होळीच्या उत्सवाची भव्यता अनुभविण्यासाठी जगभरातून पर्यटक वृंदावनला येत असतात. पण प्रेक्षकांना आता घरबसल्या आठवडाभर राधा आणि कृष्ण यांना होळीच्या रंगात रंगून जाताना पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘राधाकृष्ण’सोबत होळीचा सण प्रेक्षकांना २०-२६ मार्चदरम्यान रात्री नऊ वाजता ‘स्टार भारत’वर साजरा करता येणार आहे.
‘राधाकृष्ण’ ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.