सागरसोबत दिसली 'नवी मुक्ता', तेजश्रीच्या जागी स्वरदाला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:13 IST2025-01-14T12:11:18+5:302025-01-14T12:13:02+5:30
'प्रेमाची गोष्ट' मालिका सुरु झाली तेव्हापासूनच सागर-मुक्ताच्या केमिस्ट्रीने सर्वांना प्रेमात पाडलं होतं.

सागरसोबत दिसली 'नवी मुक्ता', तेजश्रीच्या जागी स्वरदाला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
'स्टार प्रवाह' वरील 'प्रेमाची गोष्ट' लोकप्रिय मालिकेत नुकतीच नव्या मुक्ताची एन्ट्री झाली आहे. तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळेची (Swarda Thigale) एन्ट्री झाली आहे. तिने सेटवर स्क्रीप्ट वाचत असतानाचा फोटोही शेअर केला होता. तर आता स्टार प्रवाहच्या मकर संक्रांती स्पेशल कार्यक्रमात सागर आणि मुक्ता पहिल्यांदाच एकत्र दिसले. यावेळी सागरसोबत नव्या मुक्ताला पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'प्रेमाची गोष्ट' मालिका सुरु झाली तेव्हापासूनच सागर-मुक्ताच्या केमिस्ट्रीने सर्वांना प्रेमात पाडलं होतं. राज हंचनाळे (Raj Hanchanale) सागरच्या भूमिकेत असून तेजश्री प्रधान मुक्ता कोळीच्या भूमिकेत होती. 'होणार सून मी या घरची' मालिकेनंतर तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' मधूनही सर्वांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरली. मात्र आता तिच्या मालिकेतून बाहेर पडण्याने चाहत्यांची निराशा झाली. स्टार प्रवाहच्या संक्रांत स्पेशल कार्यक्रमात वाहिनीवरील सर्व मालिकांतील कलाकार एकत्र आले. त्यांनी मकर संक्रांत साजरी केली. यावेळी पहिल्यांदाच राज आणि स्वरदा ठिगळे एकत्र दिसले. सागर-मुक्ताची एन्ट्री झाली आणि दोघांनी तिळगूळ वाटत संक्रांत साजरी केली. इतर कलाकारांसोबत धमाल केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले, 'मिस यू तेजश्री', 'ही नवी मुक्ता सागरला शोभून दिसत नाही', 'ओरिजनल ते ओरिजनलच' अभिनेत्री स्वरदा ठिगळेला सध्या नेटकऱ्यांच्या अशा प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत आहे. तेजश्रीला रिप्लेस केल्यानंतर आता ती मुक्ता म्हणून चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्वाचं आहे.