Kiran Mane :  माझा वारकरी आज्जा सांगायचा मशिदीतल्या किर्तनाची गोष्ट..., किरण मानेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 01:16 PM2022-05-04T13:16:12+5:302022-05-04T13:16:51+5:30

Raj Thackeray Loudspeaker Row, Kiran Mane : राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भोंग्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. अशात अभिनेते किरण माने यांची मशिदींवरच्या भोंग्यांच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Raj Thackeray Loudspeaker Row actor kiran mane shared a post | Kiran Mane :  माझा वारकरी आज्जा सांगायचा मशिदीतल्या किर्तनाची गोष्ट..., किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane :  माझा वारकरी आज्जा सांगायचा मशिदीतल्या किर्तनाची गोष्ट..., किरण मानेंची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

Raj Thackeray Loudspeaker Row : सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून वाद सुरु आहे.राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आपल्या भूमिकेवर ठाम राहत आजपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भोंग्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. अशात अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची मशिदींवरच्या भोंग्यांच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांच्या पोस्टची चांगलीच चर्चा आहे.  ‘मशिदीतल्या किर्तनाची गोष्ट’ त्यांनी या पोस्टमधून सांगितली आहे. किरण मानेंचा वारकरी आज्जा त्यांना ही गोष्ट सांगायचा, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

वाचा, किरण मानेंची पोस्ट त्यांच्याच शब्दांत

"अरे ! ये बरसात में कौन भिजते खडा है?"

- "भाईजान ये तो देहू का भौत बडा संत तुकाराम महाराज !! बुलाव तो उनको मस्जिद में, आंग पोछने को कपडा बिपडा देवो.."

मशिदीत नमाज़साठी जमलेल्या मुस्लीम बांधवांमध्ये कुजबूज सुरू होती...

...तुकोबाराया दिंडी घेऊन पंढरीला चाललेवते. पुण्यातनं जातानाच तुफान पाऊस सुरू झाला. दिंडी पुण्यातल्या भर चौकात होती. तुकोबा अभंगात दंग होऊन नाचत होते. दिंडीतले वारकरी पावसाच्या मार्‍यामुळं हळूहळू आडोसा शोधायला लागले. कुनी कुठे वळचनीला, कुनी एखाद्या घराच्या ओसरीवर, कुनी दुकानात जाऊन उभे राहिले. तुकोबाराय मात्र विठ्ठलाच्या नामघोषात गुंग होऊन पावसातच भिजत नाचत होते.

...त्याच चौकात बाजूला एक मस्जिद होती. तिथं नुकतीच नमाज़ आटपून सगळे नमाज़ी पाऊस थांबायची वाट बघत थांबले होते. सगळ्यांचं लक्ष तुकोबारायांकडे गेलं आणि वरचा संवाद सुरू झाला.

...शेवटी एकानं धाडस करून हाक मारली, "ओ तुकारामबुवा, आहो भिजतेय कायकु? आवो मसजीद में.."

तुमचा विश्वास बसनार नाय भावांनो, मशिदीतल्या मुसलमानांनी आपल्या तुकोबारायाला लै अदबीनं आन् आदरानं आत नेलं... तुकोबाराया म्हन्ले, "आवो माझे वारकरी बाहेरच भिजतायत." हळूहळू सगळ्यांनी मिळून पूर्ण दिंडीला बोलावून मशिदीत आनलं..अंग पुसायची आनि गुळपान्याची सोय केली.. पाऊस असा तुफानी पडत होता की थांबायची चिन्हं दिसेनात..

...हळूहळू रात्रीची किर्तनाची वेळ झाली.. मूर्तीपूजा न माननार्‍या मुसलमानांच्या मशिदीत तुकोबा काय बोलतील आनि कसे किर्तन करतील असा प्रश्न सगळ्या वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसायला लागला..

...आनी भावांनो, दिल थामकर बैठिये ! तुमाला ठावं हाय, आपला वाघ लै खतरनाक होता'... तुकोबाराया किर्तनाला उभा राहिला... सगळे डोळे विस्फारून बघायला लागले.. तुकोबानं खनखनीत आवाजात अभंग सुरू केला -

आवल्ल आल्ला नाम बडा लेते भूल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ।।

अल्ला एक तुं नबी एक तुं । काटतें सिर पावों हात नहीं जीव डराये ।।

सुनो भाई बजार नहीं सब हि नर चलावे । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलावे ।।

एक तीर नहीं प्यार जीतनकी आस । कहे तुका सो हि मुंडा राखलिये पायेनपास ।।

...अल्ला 'अव्वल' म्हणजेच सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं नाव घ्यायला विसरु नकोस. वीणा वाजवत त्याचं स्तवन कर.

...तूच अल्ला आणि परमेश्वराची शिकवण माणसांपर्यंत पोचवणारा पैगंबरही तूच. तुझे नाम घेताना हात, पाय वा शीर कापून टाकले तरी भीती वाटत नाही.

...ऐका रे भावांनो, हा माणसांनी भरवलेला बाजार नाही हा अल्लाचा बाजार आहे. इथे लहान-मोठा, उच्च-नीच असा भेद नाही, सगळे समान आहेत. ...शेवटी तुका म्हणे : पैलतीर गाठणं अर्थात मूक्ती-मोक्ष वगैरे मिळवणं हा माझा उद्देश नाही, तर मला फक्त प्रेम जिंकण्याची आस आहे. त्यामुळे हे संतांनो मला तुमच्या पायाशी रहाण्याचा आनंद घेऊद्या.

उर्दू,फारसी आनि मराठी शब्दांनी सजवलेल्या या अभंगाचा आशय खोलात जाऊन अभ्यासला तर मुस्लीमांमधल्या सूफ़ी भक्तीगीताशी नातं जोडनारा वाटतो. तुकोबारायांच्या काळात मुसलमान सूफ़ी संतांचा हिंदू-मुस्लिम जनतेवर लै पगडा होता. 'सूफ़ी' हा इस्लाममधला असा संप्रदाय हाय, जो आचारविचारांनी वारकरी संप्रदायाशी मिळताजुळता हाय ! धार्मिक कट्टरतेपास्नं लांब. कर्मकांड मानत नाय. प्रेम आणि नामस्मरण हीच ईश्वरापर्यन्त पोहोचन्याची खरी वाट,असं माननारा. सर्वधर्मसमभाव, मानवता, उदारमतवाद यासाठी सूफ़ी संप्रदाय प्रसिद्ध हाय.

हिंदू-मुस्लीम एकतेची नाळ किती जुनी हाय बघा भावांनो. या अभंगातला "अल्ला एक तुं नबी एक तुं । काटतें सिर पावों हात नहीं जीव डराये ।।" या ओळीतला आशय तुकोबाराया विठ्ठलासाठीही वापरतात : "फुटो हे मस्तक तुटो हे शरीर । नामाचा गजर सोडू नये ।।"...कस्लं भारी हाय गड्याहो हे ! अल्ला आणि विठ्ठल नावं वेगळी हायेत वो, मूळात 'तो' एकच हाय.

...तर, त्या पावसाळी दिवशी, त्या मशिदीत वारकर्‍यांसकट सगळे मुस्लीम बांधव भजनात गुंग झाले दोस्तांनो ! पार भिरकिट करून टाकलं तुकोबारायानं त्या दिवशीचं किर्तन... 'विठ्ठलअल्ला' नाचला आसंल त्यादिवशी सगळ्या वारकरी आणि नमाज़ींसोबत..

असा नादखुळा होता आपला तुकोबा !!!

माझा वारकरी आज्जा सांगायचा ही मशिदीतल्या किर्तनाची गोष्ट. अनेक वारकरी अनेकदा सांगतात. दिंडी पुन्यात आल्याची बातमी आली की हा प्रसंग माझ्या डोळ्यापुढे येतो.

ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल

- किरण माने.

Web Title: Raj Thackeray Loudspeaker Row actor kiran mane shared a post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.