Raju Srivastava Funeral: राजू श्रीवास्तव पंचत्वात विलीन, विनोदाच्या बादशाहने घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 05:41 PM2022-09-22T17:41:19+5:302022-09-22T17:41:43+5:30
Raju Srivastava: कॉमेडीचा बादशाह राजू श्रीवास्तव यांचे. बुधवारी २१ सप्टेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.
आपल्या दमदार कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवणारे कॉमेडीचा बादशाह राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी जगाचा निरोप घेतला. बुधवारी २१ सप्टेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले. आता गुरुवारी राजू श्रीवास्तव यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, ज्यामध्ये विनोदी कलाकाराचे जवळचे आणि चाहते उपस्थित होते. राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कॉमेडियनला निरोप देण्यासाठी अनेक चित्रपट तारे आणि राजकारणीही जवळ आले होते.
राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यदर्शनासाठी सुनील पाल, मधुर भांडारकर आणि उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री पोहोचले होते. साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ते रुग्णालयात दाखल होते. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दीड महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर होते. श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
कानपूरचे रहिवासी असलेल्या राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते आणि ते पडद्यावर गजोधर भैया या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी झाला. श्रीवास्तव आपल्या अभिनयाने सर्वांना खळखळून हसायला भाग पाडले होते. राजू श्रीवास्तव १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. २००५ मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात भाग घेतल्यानंतर त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा' (रिमेक) आणि 'आमदानी अठनी खर्चा रुपैया' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही होते.